
राजेंद्र पोतदार
अमळनेर - प्रतिनिधी Amalner
अमळनेर हे शहर जळगाव (jalgaon) जिल्ह्यात अर्थात खान्देशात (Khandesh) आहे. खान्देश म्हटला, की वर्षभरातून किमान आठ महिने तप्त ऊन...! या तप्त उन्हात भटकंती करण्याची अर्थातच कोणाला इच्छा होत नाही. मात्र, ही इच्छा व्हावी इतकेच नव्हे; तर मे महिन्याच्या प्रखर उन्हात अमळनेरला हमखास यावेसे वाटावे, अशी वातावरणनिर्मिती येथील (mangalgraha seva sanstha) मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिरात (Shri Mangaldev Graha Mandir) करण्यात आली आहे.
या मंदिरात सर्वत्र फॉगर्स बसविण्यात आले आहेत. त्यातून सतत सूक्ष्म जलबिंदूंचा येणार्या भाविक आणि पर्यटकांवर वर्षाव होत असतो. या जलबिंदूमध्ये अतिशय सुगंधी द्रव तसेच पंचगव्य मिसळण्यात आले आहे. त्यामुळे सुगंधाचा दरवळ, आल्हाददायकता सोबतच शुद्धता व शुचिर्भूततेचीही अनुभूती होते.
तसेच भाविकांचे पाय भाजले जाऊ नयेत म्हणून अतिशय उच्च दर्जाचा तापमानरोधक रंग जमिनीवर (फरशीवर) मारण्यात आला आहे. परिणामी मंदिराबाहेरील तापमानापेक्षा मंदिरातील अंतर्गत तापमान किमान १२ अंशांपेक्षाही कमी होते. हे सारे काही आल्हाददायक, सुगंधी व मनाला आणि आत्म्याला थंडावा तथा विसावा देणारे ठरते. श्री मंगळदेव ग्रहाच्या दर्शनाने, अभिषेक व शांतीने मनाची शांती होत असतानाच अंगाची लाहीलाही थांबून अंगालाही शांती लाभते.
परिणामी एकूणच शारीरिक, मानसिक भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक शांततेचा या ठिकाणी सर्वांनाच अनुभव येतो. आजमितीस कदाचित असा प्रयोग करणारे श्री मंगळदेव ग्रह मंदिर हे किमान राज्यातील (maharastra) तरी एकमेव मंदिर असावे.
l l पक्ष्यांचीही मांदियाळी l l
मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे बाराही महिने पक्ष्यांसाठी पाणी आणि खाद्याची सोय करण्यात आली आहे. मंदिरात सर्वत्र पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी आणि सर्व प्रकारचे धान्य व पक्ष्यांना आवडणारी फळझाडे या ठिकाणी बाराही महिने नेहमी उपलब्ध आहेत. त्याचा सुपरिणाम म्हणून कोठेही न दिसणारे पक्षी आता या मंदिरात रहिवास करू लागले आहेत.
मंदिर परिसरात भरपूर झाडे आहेत. या झाडांवर मंदिर व्यवस्थापनाने मडकी बांधली आहेत. या मडक्यांमध्ये हे पक्षी अंडी घालतात आणि प्रजोत्पादन करतात. पक्ष्यांसाठी सर्वत्र सुरक्षितता आहे. पक्ष्यांना कोणीही कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवत नाही. फळझाडांना पक्ष्यांव्यतिरिक्त कोणीही हात लावत नाही. त्याचा सुपरिणाम म्हणून आज सहजासहजी कोठेही ऐकायला न मिळणारी पक्ष्यांची अत्यंत सुमधुर किलबिल आता मंदिर परिसरात खास करून सकाळ आणि सायंकाळी आपणास ऐकावयास मिळते. भाविक तथा पर्यटकांसह आता मंगळदेव ग्रह मंदिर हे पक्ष्यांसाठीही मोठे आकर्षण व विसाव्याचे ठिकाण ठरते आहे.
l l पक्षी संरक्षणार्थ केला जातो जनजागर l l
पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी मंगळग्रह सेवा संस्था केवळ स्वतःच प्रयत्न करीत नाही, तर ते यासंदर्भात सोशल मीडिया तसेच माहिती पुस्तक व डिजिटल बॅनरच्या माध्यमातून सतत व्यापक जनजागरण करीत आहे. त्याचा परिपाक म्हणून अनेक पक्षीप्रेमी, भाविक तथा पर्यटक मंदिर व्यवस्थापनाला येऊन भेटतात. पक्ष्यांचे संरक्षण व संवर्धन कसे करावे? याबाबत मार्गदर्शन मागतात. तसेच पक्ष्यांना काय-काय खाऊ घालावे? कसे खाऊ घालावे? त्यांना पिण्यासाठी पाणी कोठे व कसे ठेवावे? पक्ष्यांनी अंडी घालून प्रजोत्पादन करावे म्हणून काय केले पाहिजे? याचे मार्गदर्शन घेतात. यातून आता पक्षी संवर्धन व संरक्षणाबाबतचा संस्थेने सुरू केलेला जनजागर हळूहळू वाढू लागल्याची प्रचिती येत आहे.
l l या पक्ष्यांचे आहे वास्तव्य l l
दयाळ (चिरक), पांढऱ्या छातीची पाणकोंबडी, बुलबुल, सातभाई, कोतवाल, राखी वटवट्या, भारतीय दयाळ, कवडी मैना, वंचक, पांढऱ्या छातीचा खंड्या, सूर्यपक्षी (शिंजीर), भांगपाडी मैना, कोकिळा , कोकीळ, पोपट याशिवाय चिमण्या, कावळे कावळे आणि असे काही पक्षी आहेत की ज्यांची अद्याप ओळख पटलेली नाही अशा सर्व प्रकारच्या पक्ष्यांची आता मंदिरावर नियमितपणे मोठी मांदियाळी झाली आहे. त्यामुळे आता अनेक पक्षीप्रेमीही मंदिराला आवर्जून भेट देऊ लागले आहेत.