
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान (Gramdaivat Shriram Mandir Sansthan) (रामपेठ) संचलित श्री संतमुक्ताबाई राम पालखी (Shri Santmuktabai Ram Palkhi) श्री क्षेत्र पंढरपूर ( Shri Kshetra Pandharpur) येथे आषाढी यात्रेकरिता (Ashadi Yatra) दि.14 जून रोजी वटपौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान (Departure) होईल.
श्री संत मुक्ताबार्ई पालखीचे जुन्या जळगांवातील श्रीराम मंदिर येथून उद्या दि.13 रोजी कुमारिका मुलींच्या हस्ते पुजन होईल. उद्या दि.13 रोजी संध्याकाळी 5 वाजता निघेल. नंतर भोईटे गढी, कोल्हेवाडा, तळेलेवाडा मार्गे गोपाळपुर्यातील श्री सदगुरू बाबजी महाराज समाधी येथे अभंग, आरती होवून विठ्ठल मंदिर, बाहेरपुरा, तरुण कुढापा चौक, पंत नगर,जोशी पेठ मार्गे अप्पा महाराज समाधी मंदिरात येईल.भजन, आरती होऊन पालखीचा मुक्काम रात्री श्री सदगुरू अप्पा महाराज समाधी मंदिर येथे राहील.
येथूनच दि.14 जून रोजी सकाळी 8 वाजता श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होईल. पहाटे प्रभु श्रीराम, श्री संत मुक्ताबाईच्या पादुका व श्री सदगुरू अप्पा महाराज यांचे समाधीचे पूजन, अर्चन, आरती होऊन सकाळी 7.30 वाजता पालखीस माल्यार्पण व वारकरी मंडळीस प्रवासास पायी वारीसाठी उपस्थित राहतील. ज्ञानोबा, तुकोबा व मुक्ताईंच्या नामघोषात पालखीचे सकाळी वाजता पंढरीकडे प्रस्थान होईल.
पालखी कंवरराम चौक,पंचमुखी हनुमान मंदिर,सिंधी कॉलनी,डी मार्ट मार्गे मेहरूण शिवाराती शिवाजी उद्यानाजवळील श्री संत मुक्ताई पादुका मंदिर येथे दुपारी 11 वाजता पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. मंगेश महाराज जैन, उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे हस्ते श्री संत मुक्ताईंच्या पादुकांना माल्यार्पण होवून पालखी शिरसोलीकडे मार्गस्थ होईल. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती असे आवाहन संस्थानने केले आहे.
पालखीचे नेतृत्व हभप मंगेश महाराज करणार
पालखीचे नेतृत्व वंशपरंपरेने श्री संत अप्पा महाराजांचे पाचवे वंशज व विद्यमान गादीपती ह.भ.प.श्री.मंगेश महाराज करित असून सोबत नंदू शुक्ल गुरूजी, अरूण धर्माधिकारी, दत्तुबुवा मिस्तरी, श्रीराम जोशी, पोपट महाजन, सुपडू तेली चोपदार, सखाराम महाराज न्हावी, दिलीप कोळी, खंडू तांबट, बापू महाराज पाटील, निंबा जगताप, आदी प्रवचनकार व किर्तनकार मंडळी आहेत.
जिल्हा परिषदेकडून आरोग्य सुविधा
पालखी सोबत महाराष्ट्र शासनातर्फे जळगाव जिल्हा परिषद तर्फे वारकरी मंडळींच्या आरोग्य सुविधेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वैद्यकीय पथक,जीपगाडीसह राहील. पालखी सोहळ्यामध्ये भाविकांनी सोबत अंथरूण,पांघरूण, ताट-तांब्या, पावसाळी साधन,विजेरी, टाळकरी असल्यास सोबत टाळ, इ. सामान आणावा. पालखी सोबत आलेल्या भाविकांनी डोक्यावर टोपी व कपाळी गंध असे अनिवार्य राहील.
असा राहिला पालखीचा प्रवास
शिरसोली, वावडदा, दुसखेडे, पाचोरा, लोहटार, कजगांव, रांजणगाव, मुंडवाडी, चापानेर, बोरगांव, खुलताबाद, तुर्काबाद, अमळनेर, प्रवरासंगम, नेवासे, वडाळा, जेऊर, नगर, रूईछत्तीसी, मिरजगांव, करमाळा, मांगी, करमाळा, स्टेशन जेऊर, वांगी क्र.1,टेंभुर्णी, करकंब, पवारवस्ती दि.9 जुलै या दिनी पालखी सोहळा चिंचोली (ता.पंढरपूर) येथे प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून आलेल्या संतश्रेष्ठ बंधु श्री निवृत्तीनाथ महाराज व आदिशक्ती ब्रह्मचित्कला श्री संत मुक्ताबाई या बहीण भाऊ यांचा भेट दर्शन सोहळा होवून पालखीचे वाखरी येथे महाराष्ट्रातून विविध संतांच्या पालख्या एकत्र येतात. या सोहळ्यात ही पालखी सहभागी होईल
तेथून श्री विठ्ठल, ज्ञानोबा, तुकाराम व मुक्ताबाईंच्या नामस्मरणात श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रवेश करेल. श्री क्षेत्र पंढरपूर येथे 5 दिवस पालखीचा मुक्काम जळगावकर महाराजांचा वाडा, कासार घाट, श्री संत नामदेव मंदिराजवळ,पंढरपूर येथे राहील. या 5 दिवसात रोज चंद्रभागेचे स्नान, पंढरपूर नगर प्रदक्षिणा, श्री विठ्ठल दर्शन, भजन, भारूड, प्रवचन, किर्तन, हरिजागर, श्री संत भानुदास महाराज पुण्यतिथी, श्री सदगुरू मामासाहेब दांडेकर पुण्यतिथी, गोपाळकाला इत्यादी विविध प्रकारचे कार्यक्रम होतील.