जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :
तालुक्यातील रायपूर येथील रहिवाशी भिमसिंग सांडू परदेशी यांनी पाणीपट्टी भरुनही त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्श कट करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत परदेशी यांनी ग्रामसेवक व गटविकास अधिकार्यांकडे तक्रार केली आहे.
रायपूर येथील तक्रारदार भिमसिंग परदेशी यांचे घर वॉर्ड क्रं.1 मध्ये असून नियमितपणे घर व पाणीपट्टी भरलेली आहे. तरीही ग्रामपंचायत विभागाकडून कोणती नोटीस किंवा सूचना न देता घर क्रमांक 28 चे नळ कनेक्शन कट करण्याचा प्रताप ग्रामपंचायत विभागाने केला आहे.
तसेच गावातील विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी असून सुद्धा पाणी विकत घ्यावे लागत आहे. तसेच गावातील इतरांचे कोणाचेही नळ कनेक्शन कट केलेले नाही. परदेशी यांना गावात हेतूपुरस्कर त्रास दिला जात असून माझ्यावर अन्याय केला जात असल्याची भावना त्यांनी तक्रारीत नमूद केली आहे.
याबाबत तक्रारदार भिमसिंग परदेशी यांनी सरपंच व ग्रामसेवकांना विचारणा केली असता त्यांनी तक्रारदाराचे म्हणणे ऐकूण न घेता हुकूमशाही करीत हाकलून लावले. यासंदर्भात जळगाव गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करुनही कोणतीही दखल घेतली नसल्याचा आरोप तक्रारदार भिमसिंग परदेशी यांनी केला आहे.
माझ्या अन्याय झाला असून या तक्रारीची वरिष्ठांनी दखल घेऊन वरिष्ठस्तरावरुन या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी परदेशी यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.