धरणगावात दोन दिवस संचारबंदी

चोख बंदोबस्तात वादग्रस्त अतिक्रमण हटविले
धरणगावात दोन दिवस संचारबंदी

धरणगाव । Dharangaon

शहरालगत असलेल्या गट नं. 1248/2 मधील वादग्रस्त अतिक्रण बुधवारी मोठ्या बंदोबस्तात शांततेत काढण्यात आले. दरम्यान, बुधवारी रात्री आठ वाजेपासून ते शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत शहरात संचारबंदी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. याबाबतचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत.

गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण जळगाव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ काढण्याबाबत आदेश काढले होते. त्यानंतर हेच आदेश नाशिक आयुक्तांनी कायम ठेवले होते. त्यामुळे आज सकाळी धरणगाव पोलिसांनी शांतता कमेटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शहरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. यावेळी पोलीस अधिकारी तथा महसूलच्या अधिकार्‍यांनी गावात सामाजिक एकोपा जपण्याचे आवाहन केले. तसेच वादग्रस्त परिसरात कलम 144 लागू केले असल्याचे जाहीर केले. तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. धरणगावकरांनी सामंजस्याची भूमिका घेतल्यामुळे त्याच ठिकाणी वातावरण निवळले होते. परंतू खबरदारी म्हणून शहरात दोन दिवस संचारबंदी लावण्यात आलेली आहे.

नेमकं काय म्हटलंय आदेशात

विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी, एंरडोल भाग एरंडोल, यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 (1) (2) (3) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी संपुर्ण धरणगांव शहरात दिनांक 02 चे रात्री 8 वाजेपासुन दिनांक 04 चे सकाळी 8 वाजेपावेतो संचारबंदी लागू करण्याचा आदेश पारित केला आहे. सदर बाबीचे गांभीर्य लक्षात घेता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याचे गांभीर्य लक्षात घेता वेळेअभावी सदरचा आदेश एकतर्फी लागु करण्यात येत आहे. सदर आदेश हा अत्यावश्यक सेवा जसे रूग्णसेवा, पाणी पुरवठा, आरोग्य, सार्वजनिक वितरण व्यवस्था. अंत्यविधी तसेच शासकिय कर्तव्यावर हजर शासकीय अधिकारी / कर्मचारी, धरणगांव शहरातून जाणारे मुख्य रस्त्यावरुन वाहतुक तसेच पोलीस अधिकारी व बंदोबस्तातील कर्मचारी यांना लागु राहणार नाही.

संवेदनशील विषयाची उत्कृष्ट हाताळणी !

अतिक्रमण हटविण्याबाबत गावात काही दिवसांपासून वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी धरणगावला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला होता. प्रांताधिकारी विनय गोसावी, चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रावले, पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी संवेदनशील विषयाची उत्कृष्ट हाताळणी केल्यामुळे गावात सगळीकडे शांतता होती.

मुख्य भागात चोख बंदोबस्त !

शहरातील मुख्य भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला होता. त्यात 100 पोलीस कर्मचारी, 20 महिला कर्मचारी, 4 आरसीपी प्लाटून, 10 पोलीस अधिकारी आणि 2 डीवायएसपी दर्जाचे अधिकारी यांचा समावेश होता. दरम्यान, अतिक्रमण काढण्याच्या कारवाईचा गावात कुठेही तणाव जाणवला नाही. सर्वत्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.

आजचा शेळ्यांचा बाजार बंद

प्रशासनाने शहरात संचारबंदीचे आदेश दिलेले असल्याने दि.3 रोजीचा गुरुवारचा शेळ्या-मेंढ्यांचा बाजार बंद राहणार आहे, तसेच भुसार मालाचा लिलाव देखील होणार नाही असे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रशासकांनी कळविले आले आहे.

संचारबंदी लागू केल्यानंतर सोशल मीडियात आदेशाची प्रत व्हायरल करण्यात आली आहे. तसेच एक ऑडीओ क्लिप देखील टाकण्यात आली आहे. दरम्यान, अफवा पसरविणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा ईशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com