
जळगाव - jalgaon
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) सर्वांगीण प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी कटीबध्द असून अलीकडेच पुतळ्यासाठी निधीसह अध्यासनासाठी भरीव निधी मिळवून देण्यात येणार आहे. याच प्रकारे भविष्यात निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री ना गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी दिली. विद्यापीठाचे नूतन कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी (Dr. Vijay Maheshwari) यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर ते बोलत होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नुकतीच प्रा.डॉ.विजय माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. या पार्श्वभूमिवर, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नूतन कुलगुरूंचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी आपण आजवर विद्यापीठाच्या विविध कामांना गती देण्याचा प्रयत्न केला असून भविष्यात देखील या प्रकारचे सहकार्य कायम राहणार असल्याची ग्वाही दिली. आपल्या विद्यापीठातील दर्जेदार शिक्षणाची ख्याती ही देश-विदेशात पोहचवावी. आणि हा लौकीक वाढविण्यासाठी आपल्याला हवे असणारे सर्वतोपरी सहाय्य राहणार असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
याप्रसंगी कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील, सुरेश चव्हाण, डॉ. विश्वकर्मा सर, राजेंद्र चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती होती.