भारत जोडो अंतर्गत काँग्रेसची पदयात्रा

जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांची माहिती
भारत जोडो अंतर्गत काँग्रेसची पदयात्रा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबीर घेण्यात आले असून जळगाव जिल्ह्यात देखील काँग्रेसतर्फे (Congress meditation camp)लवकर चिंतन शिबीरासह नवसंकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा काँग्रेसतर्फे जिल्ह्यात 75 कि.मी. पदयात्राचे आयोजन (Organizing walks) करण्यात आले आहे. प्रत्येक कार्यकर्ता दररोज 20 किलोमीटर पायी चालणार असून या पदयात्रेला 15 ऑगस्टनंतर सुरुवात करण्यात येईल. त्या माध्यमातून जनतेशी संवाद (Communication with the public) साधण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावापर्यंत तसेच घरापर्यंत काँग्रेस पोहोचणार असल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष (Congress District President) प्रदीप पवार यांनी गुरुवारी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत दिली.

पवार पुढे म्हणाले की, देशातील परिस्थिती आणि आव्हाने लक्षात घेवून काँग्रेसने उदयपूर येथे नव संकल्प चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. धार्मिक आणि जातीय विभाजनाच्या जाळ्यात अडकवून निवडणुकीत हित साध्य करणे हे भाजपाचे राजकारण असून तोच मुद्दा या बैठकीत चिंतनाचा विषय होता. या विचारमंथनातून सहा विषयावर सहा गट तयार करण्यात आले. त्याशिवाय येत्या काही दिवसात ब्लॉक, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व रिक्त नियुक्त्या भरून जबाबदारी निश्चित केली जाईल,असेही पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय, प्रदेश व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्‍यांंच्या कामाचे मूल्यमापन व्हावे, उत्तम काम करणार्‍या पदाधिकार्‍यांंना योग्य ती संधी देता यावी व निष्क्रीय पदाधिकार्‍यांंना पदावरून दूर करता यावे, यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस यांच्यावर विशेष जबाबदारी सोपण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीने पाच वर्षाहून अधिक काळ एका पदावर राहू नये.

काँग्रेस कार्यकारिणीचे 50 टक्के पदाधिकारी 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे असावेत, या मुद्यावर प्रभावी चर्चा या चिंतन शिबिरात झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला आमदार शिरिष चौधरी, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, शहराध्यक्ष श्याम तायडे, माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील, उदय पाटील, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी, जमिल शेख, आर.जी.पाटील, विनोद कोळपकर, देवेंद्र मराठे, श्याम तायडे, मुजिब पटेल, भूपेंद्र जाधव यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी निवडणुकीत भाजपला शह देणार -डॉ.उल्हास पाटील

आगामी काळात काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी आमदार, खासदार तसेच पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कार्य करून येत्या निवडणुकीत भाजपला शह देणार आहे, असल्याची माहिती माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्तेस आठ वर्षे पूर्ण झाली आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात जनतेला महागाईची झळ सोसावी लागत आहे. तसेच बेरोजगारी व इतर समस्येलाही तोंड द्यावे लागले आहे. मात्र आता जनतेला कळाले आहे. त्यामुळे आता जनतेला अवाहन करण्यासाठी काँग्रसतर्फे नवसंकल्प पदयात्रा काढण्यात येणार आहे. यात प्रत्येक कार्यकर्ता साधारण 20 किलोमीटर पदयात्रा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com