भाजपच्या गटनेतेपदावरुन गोंधळ अन् महासभा तहकुब

भाजपच्या गटनेतेपदावरुन गोंधळ अन् महासभा तहकुब

शिवसेना-भाजपचे नगरसेवक आमने-सामने; स्वीकृत नगरसेवक निवड लांबणीवर

जळगाव (Jalgoan) प्रतिनिधी -

मनपा स्थायी समितीतील निवृत्त ८ सदस्यांच्या जागेवर नवीन सदस्य नामनिर्देशीत करण्यासाठी, महिला बालकल्याण समितीचे पुनर्गठण आणि शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी महासभा घेण्यात आली. मात्र महासभेच्या सुरुवातीलाच गटनेतेपदावरुन भाजपच्या नगरसेवकांनी निवड प्रक्रीयेला विरोध केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक आमने-सामने आल्याने सभागृहात गदारोळ झाला. त्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी सभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला.

महानगरपालिकेची ऑनलाईन विशेष महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतिश कुलकर्णी, उपायुक्त तथा नगरसचिव श्याम गोसावी उपस्थित होते. सभेच्या कामकाजाला सुरुवात करण्यापुर्वीच भाजपचे नगरसेवक भगत बालाणी, कैलास सोनवणे, अश्‍विन सोनवणे, धीरज सोनवणे, जितेंद्र मराठे यांनी सभागृहात एन्ट्री करुन महापौरांना महासभेच्या पटलावरील विषय कायदेशीर पद्धतीचा अवलंब करावा किंवा सभा तहकुब करावी अशी जोरदार मागणी केली.

तसेच अधिकृत भाजपचे गटनेते म्हणून भगत बालाणी असतांनाही त्यांना स्विकृत नगरसेवक निवडीसाठी का बोलावले नाही असा सवाल उपस्थित करुन महापौरांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याच दरम्यान शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, सुनिल महाजन, बंटी जोशी, गणेश सोनवणे हे आमने-सामने आल्याने सभागृहात गदारोळ झाला. तसेच ऍड. शुचिता हाडा यांनीही ऑनलाईनद्वारे सभेला हरकत घेतली. त्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी सभा तहकुब केली.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड

मनपाच्या महासभेत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून विराज कावडीया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार होते. त्यासाठी महानगरपालिकेत जय्यत तयारी करण्यात आली होती. मात्र स्वीकृत नगरसेवक निवडीदरम्यान भाजपच्या गटनेत्यांना का बोलाविले नाही. असा सवाल उपस्थित करुन भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला. या गोंधळामुळेच महासभा तहकुब केल्याने स्वीकृत नगरसेवक म्हणून विराज कावडीया यांच्या नावावर शिक्कामोर्तब होवू शकले नसल्याने स्वागतासाठी आलेल्या समर्थकांसह शिवसेना कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

Related Stories

No stories found.