जळगाव महानगरपालिकेत सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यात उफाळला संघर्ष

मालमत्ता करवाढीचा मनमानी कारभार , सभागृहनेते ललित कोल्हे यांचा आरोप
जळगाव महानगरपालिकेत सत्ताधारी आणि आयुक्त यांच्यात उफाळला संघर्ष

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मनपा आयुक्तांनी (commissioner) कोणतीही करवाढ (Tax increase) केलेली नाही, असे जाहीर केले आहे. मात्र, जळगावकरांना मालमत्ता करवाढीच्या नोटीसा (Property tax

Notice) दिल्या जात आहे. या नोटीसीमध्ये जवळपास 40 ते 50 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यावरुन मालमत्ता करवाढीचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप सत्ताधारी असलेले सभागृहनेते ललित कोल्हे (Leader of the House Lalit Kolhe) यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनपा आयुक्त आणि सत्ताधारी नगरसेवकांमधील संघर्ष चव्हाट्यावर आल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

फेरमुल्यांकनाच्या नावावर गेल्या दोन महिन्यांपासून नवीन करवाढीच्या नोटीसा वितरीत करण्यात येत आहे. या नोटीसमध्ये अपुर्ण अशी माहिती देण्यात आली आहे. मिळकत कोणत्या वापराखाली आहे. हे स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळे ही पुर्णतः नोटीस चुकीची असल्याचे ललित कोल्हे यांनी म्हटले आहे.

40 ते 50 टक्के करवाढ

मनपा आयुक्तांनी कोणतीही करवाढ केली नसल्याचे जाहीर केले असलेतरी प्रत्यक्षात मात्र, 40 ते 50 टक्के करवाढ दिसून येत आहे. इमारतीचे कोणतेही नवीन बांधकाम न करता, छुप्या पध्दतीने करवाढ केली आहे.

एजन्सी बेकायदेशिर

फेर मुल्यांकनासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी असतांनाही स्थापत्य कन्सलटन्सीला मक्ता दिला आहे. ही एजन्सी खासगी असून बेकायदेशिर काम केले तर त्यांच्याकडे कोणतीही दाद मागणे नगारिकांना शक्य नाही. त्यामुळे एजन्सीच्या माध्यमातून मनमानी कारभार सुरु आहे.

आकारणी चुकीची

मालमत्ता कर आकारणी चुकीच्या पध्दतीने करण्यात आली आहे. एजन्सीने व्यवस्थितरित्या मोजमाप केलेले नाही. शिवाय मिळकत कोणत्या वापराखाली आहे. हे स्पष्ट केलेले नाही. रहिवासी जागेत भाडेकरु आहे की नाही? याचा खुलासा केलेला नाही. बांधकामाचे वर्ष नमूद नाही. त्यामुळे केलेली आकारणी ही चुकीची असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

करवाढीला स्थगिती द्यावी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. कोरोनामुळे नागरिक त्रस्त आहेत. लोकांचे रोजगार बुडाले आहे. महागाई वाढली आहे, अशा स्थितीत मनपा आयुक्तांनी कोणत्याही नगरसेवकांना विश्वात न घेता किंवा माहिती न देता. मोठ्या प्रमाणात करवाढ केली आहे. त्यामुळे करवाढीला स्थगिती द्यावी. अशी मागणी ललित कोल्हे यांनी केली आहे.

सुविधा न देता करवाढ

सद्याच्या महागाईमुळे आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने विचार करुन मुंबईसारख्या शहरात कोणतीही करवाढ न करता, उलटपक्षी कराची माफी दिलेली आहे. अन्य शहरेदेखील करमाफ करण्याच्या विचारात आहे. असे असतांनाही जळगाव महानगरपालिकेकडून कोणतीही सुविधा न देता, करवाढ केली आहे.

मनपा आयुक्तांवर सत्ताधारी नगरसेवकांची नाराजी

महानगरपालिकेत गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नगरसेवकांकडूनच आयुक्तांविषयी नाराजी ओढवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि मनपा आयुक्त असा संघर्ष सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. नगररचना विभागातील कारभाराविषयी नगरसेवक प्रशांत नाईक, आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी भरतीबाबत नगरसेवक चेतन सनकत तर आता, मालमत्ता करवाढीबाबत सभागृहनेते ललित कोल्हे यांच्याकडून आयुक्तांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. दिवसेंदिवस आयुक्ताविषयी नाराजी का वाढू लागली आहे? असा सवालदेखील आता, जळगावकरांना पडला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com