चाळीसगाव आगारातून बससेवेला प्रारंभ

संपात फुट- बारा चालक व वाहक कामावर रुजू, भडगांव-पाचोरा गावांसाठी दिवसातून १२ फेर्‍या, ३१ जणांचे निलंबन, १४ जणांना बडतर्फीची नोटीस
चाळीसगाव आगारातून बससेवेला प्रारंभ

मनोहर कांडेकर

चाळीसगाव Chalsigaon प्रतिनिधी-

राज्यात एसटी कर्मचार्‍यांचा (ST employees) जवळपास गेल्या दोन महिन्यापासून संप सुरू आहे. राज्य सरकारने पगारवाढ देऊनही हजारो कर्मचारी अद्यापही संपात सामिल आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाकडूनही कारवाईचा (action) बडगा उगारण्यात आला आहे. त्यानंतर आता हळूहळू संपात फूट पडत आहे. चाळीसगाव येथे देखील संपात फुट पडली असून १३ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे आगारातून बससेवला सुरुवात (Bus service begins) झाली.

भडगाव व पाचोरा गावांसाठी बुधवारपासून १२ बस फेर्‍या सुरु झाल्या आहेत. तसेच अजुन एक-दोन दिवसात इतर कर्मचारी देखील कामावर रुजू होणार असल्याची खात्रीशिर माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी कामगारांनी दोन महिन्यापासून कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे सुरूवातीला राज्यभरात एकही एसटी बस मार्गावर धावत नव्हती. त्यामुळे राज्य सरकारला खासगी वाहनांना सार्वजनिक वाहतुकीची परवानगी द्यावी लागली. उच्च न्यायालयाने विलीनीकरणासाठी समिती सांगितल्यानंतर राज्य सरकारने समितीही स्थापन केली. समितीचा जो निर्णय असेल, तो मान्य केला जाईल, असे परिवहन मंत्री अनिल परब सुरूवातीपासून सांगत आहेत. त्यानंतर कर्मचार्‍यांना पगारवाढही देण्यात आली. पण त्यानंतरही कामगार संपावर ठाम आहेत. त्यानंतर महामंडळाने कारवाईचा वेग वाढवला आहे. त्यामुळे आता हळूहळू संपकरी कामावर रुजू होतांना दिसत आहेत.

बुधवारी येथील कर्मचार्‍यांचा संपात फुट पडली असून तीन चालक व दहा वाहक असे एकूण १३ कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे चाळीसगाव आगारातून भडगाव-पाचोरा बससेवा बुधवार पासून नियमित सुरु झाली आहे. सद्या भडगाव सहा व पाचोरा सहा बस फेर्‍या सुरु झाल्या आहेत. दिवसातून एकूण १२ फेर्‍या चाळीसगाव आगारातून सोडण्यात येत आहे. तसेच इतर काही कर्मचारी देखील येत्या एक-दोन दिवसात कामावर रुजू होण्याची शक्यता सुत्रांकडून मिळाली आहे.

त्यामुळे आता पुन्हा चाळीसगाव आगारातून हळू हळू एसटी वाहतूक मार्गावर येणार आहे. कामगारांमध्ये आता फूट पडू लागल्याचे चित्र आहे. दरम्यान बुधवारी चाळीसगाव आगारात कामावर रुजू झालेल्या कर्मचार्‍यांचा आगार व्यवस्थापक सुनिल निकम यांनी सत्कार करुन बस सेवेला प्रारंभ केला.

याप्रसंगी सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर मगरे, शांताराम पाटील, रमेश राठोड, किरण काकडे, युवराज वाघ, उदय सोनवणे, प्रकाश मोरे, फरीद मुल्ला, मुरलीधर बोरसे, विनोद देशमुख,सईद शेख आदि उपस्थित होते.

३१ जणांचे निलंबन, १४ जणांना बडतर्फीची नोटीस-

चाळीसगाव आगारातील ३३६ कर्मचारी एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु झाल्यापासून संपात शामिल झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३१ जणांचे निलंबन करण्यात आले आहे. तर १४ जणांना बडतर्फीबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आता बुधवारी संपात येथील संपकर्‍यांमध्ये फुट पडली असून १३ कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. तर आज-उद्याकडे अजून तीन ते चार कमर्र्चारी कामावर रूजू होण्याची दाट शक्यता आहे. संपकर्‍यांनी आता प्रवशांचा अंत पाहू नये अशा प्रतिक्रिया प्रवशांमधून उमटत आहेत.

चाळीसगाव आगाराला पाच ते सहा कोटींचा आर्थिक फटका-

चाळीसगाव तालुका हा तीन जिल्ह्यांच्या सिमेवर असल्यामुळे येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. धुळे, जळगाव, औरंगाबादसह पारोळा, भडगाव, पाचोरा येथे जाण्यासाठी नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तर सुरत, पंढरपूर, पुणे येथे जाण्यासाठी देखील गर्दी असते. येथील वाहुतकीमुळे चाळीसगाव आगाराला दरारोज ७ ते ८ लाखांचे आर्थिक उत्पन्न मिळते. तर सणात हेच उत्पन्न १० ते १५ लाखांवर जाते. जवळपास गेल्या दोन महिन्यापासून सुरु असलेल्या संपामुळे चाळीसगाव आगाराला तब्बल पाच ते सहा कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे आता चाळीसगाव आगाराचे आर्थिक भिगडले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com