कोलांट उड्या!

कोलांट उड्या!

जळगाव - Jalgaon

महानगर पालिकेत भाजपच्या 30 नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे निर्विवाद असलेली सत्ता भाजपला गमवावी लागली. सहा महिन्यांतच बंडखोरांमध्येच अंतर्गत धुसफुस सुरु झाली. आणि त्याचा परिणाम म्हणून, बंडखोर 12 नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केली. मात्र हे प्रकरण इथेच थांबले नाही. घरवापसी झालेल्यांमधून पुन्हा सेनेत दाखल होण्यासाठी समर्थता दर्शविली गेली. मात्र, हा प्रयत्न असफल ठरला. जळगाव शहरात विकासाची स्वप्न पाहणार्‍या बंडखोर नगरसेवकांच्या कोलांटउड्या जळगावकरांसाठी मनोरंजनाचा विषय ठरु लागला आहे. त्यामुळे कोलांटउड्या मारणार्‍या नगरसेवकांना आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

राजकीय पुढारी विकासाचे कारण पुढे करीत असलेतरी स्वतःचा स्वार्थ साधत असतात. हे सांगणे फार काही वेगळे नाही. तर, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. असेच काहीसे चित्र जळगाव मनपात पहायला मिळतेय. मनपात भाजपची सत्ता होती. जळगावकरांनी भाजपला कौल दिल्यामुळे 57 नगरसेवक निवडणून आलेत. वास्तविक पाहता, 57 नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक अन्य पक्षातून आलेले होते. त्यामुळे भाजपात गटातटाचे राजकारण सुरु झाले, आणि नाराज नगरसेवकांनी बंडखोरी करत, शिवसेनेला पाठींबा दिला. त्यामुळे भाजपला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली.

बंडखोरी केल्यामुळे भाजपने बंडखोर 27 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी, यासाठी विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली. तर दुसरीकडे बंडखोर नगरसेवकांनीही आपल्या गटनेत्याची निवड केल्यामुळे गट नेत्याचा वाद चव्हाट्यावर आला. याच वादाची ठिणगी पडल्या मुळे स्थायी समितीतील रिक्त झालेल्या आठ सदस्यांची निवड लांबणीवर पडल्याने भाजपनेही रणनिती आखली. आणि त्यामुळे अपात्रतेच्या कारवाईच्या भीती मुळे 12 नगरसेवकांनी घरवापसी केली.

आता हे प्रकरण इथेच थांबले नाहीतर, घरवापसी केलेल्या पाच नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत दाखल होण्याची समर्थता दर्शविल्यामुळे शिवसेना नेत्यांची त्यांच्या स्वागताचीही तयारी केली होती. मात्र, हा प्लॅन असफल ठरला. नगरसेवकांच्या या कोलांटउड्यांमुळे हास्यास्पद स्थिती जळगावकरांना पहायला मिळत आहे.

सत्ताधारी आणि विरोधक ‘आगे, आगे देखो होता है क्या ’ असे म्हणू लागले आहे. सत्ताधारी असोत, की, विरोधक असोत अशा नगरसेवकांना शहराच्या विकासाचे कुठलेही सोयरसुतक नाही. असेचं म्हणावे लागेल. विकासाच्या गप्पा मारणार्‍या नगरसेवकांनी केवळ स्वार्थीपणासाठी कोलांटउड्या मारणे बंद जर केल्या नाहीत किंवा प्रभागातील विकास कामे केली नाहीत तर निश्चितपणे आगामी काळात जळगावकर त्यांची जागा त्यांना दाखविल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. हे मात्र निश्चित..!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com