
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
कोरोनासह अन्य कारणामुळे स्थगित झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांबाबत (market committees) नागपूर खंडपीठाने निर्णय दिल्याने निवडणुकांचा (election) मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांच्या निवडणुका महिनाभरात जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने आणि कोरोना काळात निवडणुका न झाल्याने या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आले होते. जिल्ह्यात नुकतीच जिल्हा दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमुळे जिल्ह्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले. आता नागपूर खंडपीठाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी दिली. दि. 30 एप्रिलपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आहेत. तसेच अंतीम मतदार याद्यांचे काम आधीच पूर्ण झाले आहे. त्यामुळे महिनभरात या बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या बाजार समित्यांची होणार निवडणूक
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या बाजार समित्यांमध्ये जळगाव, भुसावळ, यावल, जामनेर, चोपडा, पारोळा, बोदवड, धरणगाव, चाळीसगाव, अमळनेर, रावेर, पाचोरा यांचा समावेश असून यासाठी निवडणूक होणार आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या नंतर जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीच्या रणसंग्राम पाहण्यास मिळणार आहे.