
रावेर|प्रतिनिधी- Raver
येथील दत्तजयंती उत्सवानिमित्त रथ आणि पालखी उत्सवाला प्रशासनाने परवानगी दिली आहे. पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी कोरोनाच्या नियम आणि अटींच्या अधीन राहून ही परवानगी दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली.
याबाबत पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या दालनात दत्त मंदिर संस्थानचे गादीपती ऋषिकेश कुलकर्णी महाराज आणि कार्यकर्त्यांची बैठक सोमवारी झाली. त्यावेळी कैलास नागरे यांनी सांगितले, की प्रशासनाने १८३ वे वर्ष असलेल्या दत्त जन्मोत्सव, रथ आणि पालखीसाठी नियम आणि अटींच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून उत्सव साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले.
दत्त जयंती उत्सव आणि रथ पालखी साजरी होत असताना, यात्रेसाठी मात्र परवानगी नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दत्त मंदिर परिसरात आणि गांधी चौकात कोणत्याही दुकानाला परवानगी देण्यात येणार नसून कमीत कमी वेळेत आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून या उत्सवासाठी परवानगी देण्यात आली आहे. पालखी उत्सवानंतर होणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीला मात्र परवानगी देण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत पोलिस पाटील लक्ष्मीकांत लोहार, दिलीप वैद्य, गिरीश पाटील, संतोष पाटील, अमोल पाटील, भूषण कासार, सुधाकर नाईक यांच्यासह गोपनीय विभागाचे राजेंद्र करोडपती, पुरुषोत्तम चौधरी उपस्थित होते. दरम्यान, मागील वर्षी कोरोनाच्या निर्बंधांमुळे गावातून मिरवणूक काढता आली नव्हती.
रथाचे पूजन करून पाच पावले रथ ओढण्यात आला होता.आणि पालखीची देखील गावातून मिरवणूक न काढता मंदिर परिसरातच मिरवणूक काढण्यात आली होती. यावर्षी नियमांच्या अधीन राहून का असेना पण परवानगी मिळाल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.