जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण,कुपोषणावर भर देणार

नूतन सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी स्वीकारला पदभार
जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षण,कुपोषणावर भर देणार

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्हा परिषदेचे 35 वे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मावळते सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडून सोमवारी पदभार स्वीकारला. दरम्यान, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य, शिक्षण, कुपोषणावर अधिक भर देणार असल्याची ग्वाही सीईओ डॉ. आशिया यांनी दिली.

याप्रसंगी जि.प.चे अतिरिक्त सीईओ कमलाकर रणदिवे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी महिला व बालविकास अधिकारी आर.आर.तडवी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी बी.ए.बोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भिमाशंकर जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब अकलाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अविनाश इंगळे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

मुळचे राजस्थानातील जोधपूर येथील रहिवासी असलेले डॉ. पंकज आशिया यांनी निम्स मेडीकल कॉलेजातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. 2016 मध्ये त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून 29वी रँक मिळवली आहे.

फरिदाबाद येथे प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर निधी आयोगाचे सहाय्यक सचिव, कळवण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, मालेगाव येथे कोरोना काळात स्पेशल मॉनिटरिंग ऑफीसर म्हणून काम केले आहे.

करोना काळात मालेगाव आणि भिवंडी या दोन शहरांमध्ये विशेष आरोग्य सुविधा दिल्या आहेत. राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पहिला हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरासाठी डॉ. आशिया यांची शासनाने स्पेशल मॅनिटरिंग ऑफिसर म्हणून नियुक्ती केली होती. मालेगावात कमी कलावधीत कोरोनाच्या लाटेला अटकाव करणार्‍या मालेगाव पॅटर्नमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.

कोविड केअर सेंटरमध्ये अद्ययावत सुविधांवर राहणार भर

दरम्यान, जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत आरोग्य, शिक्षण, कुपोषणावर अधिक भर देणार असून जिल्ह्यातील समस्यांचा अभ्यास करुन नवीन योजना कार्यान्वित करण्यात येईल,अशी ग्वाही नूतन सीईओ डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले.सध्या कोविडच्या रुग्णांची संख्या घटली असली तरी कोविडच्या तिसर्‍या लाटेसाठी सज्ज राहून कोविड केअर सेंटरमध्ये अद्ययावत सुविधा, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा या गोष्टींवर लक्ष देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com