जिल्ह्यातील कामे थांबविण्यासाठी खडसेंकडून अधिकार्‍यांना ब्लॅकमेलिंग

आमदार चव्हाणांसह सत्ताधार्‍यांचा डीपीडीसीच्या बैठकीत आरोप
जिल्ह्यातील कामे थांबविण्यासाठी खडसेंकडून अधिकार्‍यांना ब्लॅकमेलिंग

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

भ्रष्टाचाराच्या नावाखाली राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे अधिकार्‍यांना ब्लॅकमेलींग करून विकासकामे थांबवितात असा घणाघाती आरोप भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला. दरम्यान जिल्ह्याच्या विकासात अडथळा ठरणार्‍या झारीतील शुक्राचार्याचा निषेध करण्याचा ठरावही या बैठकीत मांडण्यात आला.

जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या बैठकीला व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुर्नवसन मंत्री अनिल पाटील, खा. उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकीत, उपायुक्त मच्छिंद्र भांगे, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जळगाव ते चाळीसगाव रस्त्यावरील खड्ड्यांचा मुद्दा भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, जिल्ह्यात 450 कामांसाठी 939 कोटी रूपयांचा निधी मंजूर असतांना कामांचे कार्यादेश दिले जात नसल्याची तक्रार केली. यावेळी पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांना जाब विचारला. यावेळी आ. चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्याकडून अधिकार्‍यांना भ्रष्टाचाराच्या नावाखाली ब्लॅकमेलींग होत असल्याचा खळबळजनक आरोप केला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com