
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
भाजपाला (BJP) आगामी विधानसभा निवडणुकीत (assembly elections) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे आणि संकटमोचक गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली 288 पैकी 155 पेक्षा अधिक जागा (Seats) मिळतील त्यादृष्टीने भाजप प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेश सरचिटणीस (State General Secretary) विजय चौधरी यांनी शनिवारी अजिंठा विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राज्यभरात भारतीय जनता पार्टीतर्फे बूथ सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते जळगाव जिल्हा दौर्यावर दि.25 रोजी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, भाजपातर्फे राज्यभर बूथ सशक्तीकरण अभियाना राबविण्यात येत आहे.
बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्यात 5 मार्चपर्यंत भाजपाची तालुका, शहर कार्यकारिणी तसेच विस्तारक यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर बूथस्तरावर विस्तारकांचे दररोज 10 तास प्रवास होणार आहेत. त्यादृष्टीने भाजपाची संघटन बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्र, राज्य सरकारच्या योजना बूथच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. मतदार, नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकार राबविण्यात असलेल्या योजनांची माहिती मिळणार आहे.
राज्यातील 13 कोटी नागरिकांपैकी साडेसहा कोटी लाभार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ घेतला आहे. लाभार्थ्यांकडून धन्यवाद मोदीजी अभियानांतर्गत त्यांच्याकडून पत्र लिहून घेतले जाणार आहे. त्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाणार आहेत.
विविध योजनांचा लाभ मिळालेले नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी धन्यवाद पत्र लिहून देतील,असेही विजय चौधरी यांनी सांगितले. तसेच भाजपातर्फे फ्रेन्डस ऑफ बीजेपी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.