नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी सज्ज रहावे : उच्च शिक्षण संचालक

नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी सज्ज रहावे : उच्च शिक्षण संचालक

जळगाव jalgaon

नवीन शैक्षणिक धोरणात (New Education Policy) उच्च शिक्षणाच्या (higher education) अनुषंगाने अमुलाग्र बदल (drastic change) येऊ घातले असून महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी संस्थाचालक, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांना सोबत घेऊन हे धोरण राबविण्यासाठी सज्ज रहावे, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असे प्रतिपादन राज्याचे उच्च शिक्षण संचालक (Director of Higher Education) डॉ.धनराज माने यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्यावतीने शुक्रवार दि.२९ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या प्राचार्यांच्या बैठकीत डॉ.माने बोलत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी. इंगळे होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघर तिरंगा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी या दोन प्रमुख विषयांवर डॉ.माने यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विद्यापीठ, महाविद्यालये, गाव, आणि घराघरात तिरंगा लावावा. देशाबद्दलची आपुलकी व राष्ट्रभक्तीची भावना भावी पिढीत वाढीला लागण्यासाठी प्राचार्यांनी सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करावेत.

प्रभात फेऱ्या काढाव्यात असे आवाहन त्यांनी केले. सर्व महाविद्यालयांनी नॅक मानांकन करुन घेणे गरजेचे आहे. पदभरती तसेच प्राध्यापकांची बढती हे सुध्दा नॅकशी निगडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन करुन घ्यावे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी डॉ.माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील कृती गटाने दिलेला अहवाल राज्य शासनाने स्वीकारला असून त्याअंतर्गत काही समित्या स्थापन केल्या असून या समित्यांचे काम अंतीम टप्प्यात आहे. या समित्यांचा लवकरच अहवाल प्राप्त होईल आणि हे धोरण राबविले जाईल. अशी माहिती डॉ.माने यांनी दिली.

यावेळी झालेल्या चर्चेत प्राचार्य डॉ. पी.आर.चौधरी, प्राचार्य डॉ. पी.एच.पवार, प्राचार्य डॉ.के.बी.पाटील, प्राचार्य डॉ.अरविंद चौधरी, प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने यांनी सहभाग घेऊन मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप प्रा.एस.टी.इंगळे यांनी केला. प्रास्ताविक रासेयोचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com