कैद्याकडून पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न

कैद्याने स्वत:वरही केले वार ; जिल्हा कारागृहातील घटना
कैद्याकडून पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न

जळगाव । प्रतिनिधी jalgaon

अंगझडती घेण्याचा राग आल्याने कैद्याने (prisoner) कारागृहातील (jail) पोलीस शिपायावर शिवीगाळ व अरेरावी करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कैद्याने स्वत:वरही वार करून घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी 6 वाजता घडली. याप्रकरणी हल्ला करणार्‍या कैद्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा कारागृहात (district jail) पोलीस शिपाई राम घोडके , सुभेदार सुभाष खरे, कुलदीपक दराडे, निवृत्ती पवार, नीलेश मानकर , रामचंद्र रोकडे, सीताराम हिवाळे हे बुधवारी सायंकाळी बॅरेकमध्ये जावून कैद्यांची अंगझडती घेत होते.

यादरम्यान एका बॅरेकमध्ये कैदी सचिन दशरथ सैंदाणे याची अंगझडती घेण्यासाठी गेले. त्याने अंगझडतीत विरोध करत कर्मचार्‍यांना अरेरावी करत शिवीगाळ व धक्काबुक्की केली . त्यानंतर लोखंडी पत्रा कर्मचार्‍याला मारत स्वत:च्या डोक्यात पत्र्याने वार करून घेतले व दुखापत केली.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

घटनेची माहिती मिळाल्यावर सर्कल जेलर एस.पी पवार यांनी कारागृहात भेट दिली तसेच गुन्हा दाखल करण्याबाबत जिल्हापेठ पोलिसांना पत्र दिले. याप्रकरणी पोलीस शिपाई राम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैदी सचिन सैंदाणे याच्याविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन सैंदाणे हा शनिपेठ पोलिस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात 25 सप्टेंबर 2016 पासून जळगाव जिल्हा कारागृहात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, कारागृहातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

कारागृहातील कैद्याकडे आढळला मोबाईल

जळगाव । प्रतिनिधी

जिल्हा कारागृहातील कैदी प्रशांत अशोक वाघ (रा. मालेगाव जि. नाशिक ) याच्याकडे मोबाईल आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा कारागृहाच्या पाठी मागील भींतीवरून एका अज्ञात व्यक्तीने बुधवारी सायंकाळी 5 ते 5.45 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या कोविड बॅरेक व बॅरेक क्रमांक 12 मधील मोकळ्या भागात मोबाईल फेकला. फेकलेला मोबाईल न्यायालयीन कैदी असलेला प्रशांत अशोक वाघ याने उचलला.

दरम्यान, कैदी प्रशांत वाघ यांच्याकडे मोबाईल आढळून आल्याने कारागृह पोलीस कर्मचार्‍यांनी मोबाईल हस्तगत केला आहे. कैदी प्रशांत वाघ याने 18 नोव्हेंबर रोजी एरंडोल शहराच्या पुढे भालगाव फाटा येथे जवानाला चाकूचा धाक दाखवून लुटून नेणार्‍या चार दरोडेखोरांपैकी एक दरोडेखोर आहे. कारागृह कर्मचारी बुढन भिकन तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कैदी प्रशांत अशोक वाघ यांच्यासह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत कुमावत करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com