भालोदला बौद्ध वस्तीवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

40 जणांची लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड, फायटरने मारहाण व दगडफेक
भालोदला बौद्ध वस्तीवर हल्ला, दोघे गंभीर जखमी

यावल । Yawal । प्रतिनिधी-

तालुक्यातील भालोद येथील तरुणासोबत झालेल्या वादात सोडवासोडव केल्याचा राग म्हणून रावेर तालुक्यातील सावदा, कोचूर, न्हावी, फैजपूर, चिनावल येथील लोकांनी थेट भालोद येथील बौद्ध वस्तीवर लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड, फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला. जवळपास 40 ते 50 लोकांनी अचानकपणे भ्याड हल्ला केल्याने सर्वत्र पळापळ सुरू झाली यात अनेक जण जखमी झाले असून या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

आशुतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला 10 ते 11 टाके बसलेले आहे तर रोहित याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

दि.27 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता भालोद येथील बौद्ध वस्तीवर ललित सुनील वाणी, भूषण नेमाडे, चेतन सोनवणे, प्रशांत सोनवणे, हेमंत दिलीप पाटील सर्व रा.न्हावी, भास्कर चौधरी, गणेश उर्फ देवा देवकर रा. सावदा, कल्पेश पाटील, सुनील संतोष चिमणकर, पवन सुतार सर्व रा.कोचुर, भूषण जाधव, नीरज झोपे, रितेश चौधरी, शिवम बाविस्कर रा.सावदा, इंद्रजीत पाटील, मयूर भारंबे, शुभम भारंबे सर्व रा. फैजपूर व त्यांच्या सोबत जवळपास 30 ते 40 जणांनी हल्ला चढविला. हल्ल्यांमध्ये आशुतोष अशोक भालेराव वय 21 तसेच रोहित मधुकर लोखंडे वय 20 दोघे रा. भालोद हे गंभीर जखमी झाले. यापैकी रोहित लोखंडे याची प्रकृती चिंताजनक असून दोघे जखमी जळगाव शासकीय रुग्णालयात दाखल आहेत.

यादरम्यान भरत चौधरी आणि शुभम कराड यांच्या मध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित लोखंडे याचा राग मनात आल्याने मुलांनी भालोद येथील बौद्ध वस्तीवर दगडफेक करून लाठ्याकाठ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून अनेकांना जखमी केले.

यात रोहित लोखंडे याला डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत करून, जातिवाचक शिवीगाळ केली यांना धडा शिकवावा लागेल अशा प्रकारची जातीयवाचक शिवीगाळ करून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांंनी व लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.या जातीयवाद्यांची मुजोरी इथवरच थांबली नाही तर ज्या महिला आपल्या मुलांना यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होत्या. त्यांनाही मारहाण करून त्यांच्या सोबत अश्लील वर्तन करण्यात आले.

आरोपी ललित सुनील वाणी व गणेश उर्फ देवा देवकर यांनी त्यांच्या हातातील कोणत्या तरी हत्याराने आशुतोष भालेराव यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली असून भांडण सोडविण्यासाठी आलेले साक्षीदार सुलभा मधुकर लोखंडे, उज्वला अशोक भालेराव,संगीता रुपेश भालेराव यांना सुद्धा संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावर विटांचे तुकडे फेकून मारले. तसेच सुलभा मधुकर लोखंडे यांचे ब्लाउज फाडून तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले.

गुन्ह्या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये संशयितांविरुद्ध र.नं 224/2022 भा.दं.वि कलम 143, 147, 148, 149, 326, 324, 354, 323, 337, 504 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 2016 चे कलम तीन 3(1)(आर)(एस)(3)(1)(डब्लू) (आय) (ळळ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर डॉ.कुणाल कुमार सोनवणे हे करीत आहे. भ्याड हल्ल्याचा विविध राजकीय व सामाजिक संस्था, संघटना तसेच सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com