
जळगाव । Jalgoan प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) 650 किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प (Solar power project) आस्थपित करण्यासाठी जळगाव जिल्हा नियोजन समितीने 3 कोटी 66 लाख 71 हजार 960 रूपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. अशी माहिती कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्प (Solar power project) स्थापित करण्यासाठी विद्यापीठाने 9 मार्च 2022 रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे सादर केल्या नंतर जिल्हा नियोजन समितीच्या लेखाशिर्षात असलेल्या अपारंपरीक ऊर्जा विकास अनुदान योजनेतून हे अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. प्रस्ताव सादर केल्या नंतर अवघ्या 15 दिवसांच्या आत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठात मोठ्या प्रमाणात विजेची बचत होणार आहे.
सद्या विद्यापीठाला सुमारे 2 हजार किलो वॅट चा मंजूर अधिभार आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यानंतर किमान एक तृतीयांश वीजेची बचत होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत हा प्रकल्प कार्यान्वीत केला जाणार आहे. निधी प्राप्त झाल्यानंतर लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल. अशी माहिती कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.के.एफ.पवार, प्रभारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.दीपक दलाल, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सुनील कुलकर्णी, विद्यापीठ कार्यकारी अभियंता इंजि.एस.आर.पाटील,जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील उपस्थित होते.
मे महिन्यात होणार पदवी प्रदान समारंभ
विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली असल्याचे कुलगुरु प्रा. माहेश्वरी (VC Pvt. Maheshwari) यांनी सांगितले. तसेच विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.पीएच.डी साठी पूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार आहे.विद्यापीठाचा पेपरलेस कामकाजावर भर राहणार असल्याचेही ते म्हणाले.विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्या सोमवारी विद्यार्थी संवाद उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच दि.18 ते 24 एप्रिल,2022 या कालावधीत पेट परीक्षा घेण्यात येणार असल्याचे संकेत कुलगुरू प्रा. माहेश्वरी (VC Pvt. Maheshwari) यांनी दिले.
परीक्षा ऑफलाईन मात्र बहुपर्यायी पध्दतीने होणार
गेल्या दोन वर्षापासून कोविड-19 च्या महामारी मुळे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत होत्या मात्र सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा आता ऑफलाईन घेण्याचा निर्णय आज झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असल्याचे प्रा.माहेश्वरी यांनी सांगीतले. विद्यापीठाव्दारे घेण्यात येणार्या उन्हाळी 2022 च्या लेखी परीक्षा बहुपर्यांयी (एमसीक्यू) स्वरुपात ऑफलाईन पध्दतीने विद्यापीठाने ठरवून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील. आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी ऑफलाईन घेण्यात येतील. प्रात्यक्षिक व मौखिक परीक्षांचे आयोजन हे प्रचलित पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल. हिवाळी व उन्हाळी परीक्षा या पूर्वीच्या प्रचलित पध्दतीने दीर्घोत्तरी घेण्यात येणार असल्याचे कुलगुरुंनी सांगितले.
शहादा येथे रंगणार युवारंग युवक महोत्सव
यंदा युवक महोत्सव घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि.18 ते 21 एप्रिल,2022 या कालावधीत शहादा येथील पुज्य साने गुरूजी विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात हा महोत्सव घेण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू प्रा. माहेश्वरी (VC Pvt. Maheshwari) यांनी यावेळी दिली.