
अमळनेर Amalner
धुळे आगाराची धुळे चोपडा बस (unrepaired bus) क्र.एम.एच.14,बी.टी.2138 ही बस शनिवार रोजी सकाळी 09.30 वाजेच्या सुमारास धुळ्याहून चोपड्याकडे जात असताना सावखेडा गावाच्या हाकेच्या अंतरावर अचानक बस एका बाजूने झुकत असल्याचे महिला वाहक एम.आर.पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी चालकाला बस थांबविण्याचे सांगितले. सगळ्या प्रवाशांना (passengers) तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्यांच्या समयसूचकतेने बसमधील प्रवाशांचे जीव वाचल्याने प्रवाशांनी महिला वाहकाचे कौतुक केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदरहू बस धुळे आगाराची असून धुळे चोपडा जात होती.सकाळी 09.30 वाजेच्या सुमारास सावखेडा गाव हाकेच्या अंतरावर असताना बसचा पाटा तुटल्याचा आवाज आला.मात्र चालकाला ही बाब लक्षात न आल्याने गाडीचा वेग कमी होऊन ती एका बाजूला झुकत चालली होती.बऱ्याच अंतरापासून बस झुकतच होती. ही बाब महिला वाचकाला तात्काळ लक्षात आली आणि त्यांनी चालकाला गाडी थांबविण्यास सांगितले आणि सर्व प्रवाशांना गाडीतून उतरण्यास सांगितले.
गाडीत पन्नासच्या अधिक प्रवासी होते.उतरलेल्या प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून मार्गस्थ केले.महिला वाहकाच्या सांगण्यानुसार गाडी थांबताच पाटा तुटल्याचे निदर्शनास आले.सदर बस ही नुकतीच अवधान कार्यशाळेतून दुरूस्ती होऊन आलेली होती.गाडीचा पाटा नादुरुस्त असल्याचे चालकाने गाडी ताबा घेण्यापूर्वी सांगितले. आणि सदरहू बस नेणार नाही असेही ठामपणे सांगितले. मात्र अधिकाऱ्यांनी न ऐकता बस रवाना केली. सहा महिन्यांपासून बसेसचा असा सावळा गोंधळ कारभार सुरू असून कार्यशाळेतील कर्मचारीही फारसे लक्षही देत नसल्याचा प्रकार सुरू असल्याचे चालकाने सांगितले.
जर महिला वाहकाला सदर बसचा प्रकार लक्षात आला नसता तर बस पलटी झाली असती व मोठी दुर्घटना घडून प्रवाशांचे जीव गेले असते.एकीकडे एस.टी. महामंडळ बसमध्ये प्रवास करण्यासाठी आवाहन करीत असतात आणि प्रवासी वर्गही एस.टी. बसेस वर विश्वास दाखवून निःसंकोचपणे प्रवास करतात आणि हेच महामंडळ नादुरुस्त बसेस पाठवित प्रवाशांच्या जीवाशी खेळत असेल तर होणाऱ्या जीवितहानीची कोण जबाबदारी घेईल असा प्रश्न प्रवासी वर्गामधून उद्भवत होता. मात्र महिला वाहकामुळे जीव वाचल्याने सर्व प्रवाशांनी महिला वाहकाचे आभार मानलेत.