जिल्ह्यासाठी 13 अ‍ॅब्युलन्स

जि.प.आरोग्य विभाग 8 तर ग्रामीण रुग्णालयासाठी 5 अ‍ॅब्युलन्स दाखल
जिल्ह्यासाठी 13 अ‍ॅब्युलन्स

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्ह्यासाठी 13 अ‍ॅब्युलन्स प्राप्त होणार आहे. यात जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागासाठी 8 तर 5 ग्रामीण रुग्णालयासाठी भुसावळ विभागात दाखल झाल्या आहेत.

मात्र, अ‍ॅब्युलन्सच्या सर्व कागदपत्रांची आरटीओ विभागाकडे पुरर्तता केल्यानंतर जिल्हा परिषदेला अ‍ॅब्युलन्स प्राप्त होणार आहेत. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात उपजिल्हा रुग्णालयासह 77 प्राथमिक आरोग्य केंद्र असून या आरोग्य केंद्रांसाठी प्रत्येकी 1 असे 77 अ‍ॅब्युलन्स देण्यात आलेल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून घेतलेल्या अ‍ॅब्युलन्समध्ये काही अ‍ॅब्युलन्स खराब आणि नादुरुस्त झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आजारी रुग्णांना अन्य तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी दाखल करण्यासाठी अ‍ॅब्युलन्स अत्यावश्यक आहेत.

म्हणून जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाकडून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे 15 अ‍ॅब्युलन्ससंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आलेला होता.जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्या मागणीनुसार जिल्ह्यासाठी 13 अ‍ॅब्युलन्स प्राप्त झालेल्या आहेत.

मिनीमंत्रालयाचा कणा असलेल्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाला अधिकच सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वारंवार अ‍ॅब्युलन्स मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. कोरोनाच्या संकट काळात जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाला या 8 अ‍ॅब्युलन्स प्राप्त झाल्या असून सर्व कागदपत्रांची पुरर्तता केल्यानंतर जि.प.च्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर 8 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेत अ‍ॅब्युलन्स दाखल होऊन आरोग्याची सेवेला बळकटी मिळणार आहे.

77 प्राथमिक आरोग्य केंद्रांवर मदार

जळगाव जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वैद्यकीय अधिकार्‍यांसह आरोग्य सेवक आणि कर्मचारी जसे महत्वाचे घटक आहेत. त्याचप्रमाणे रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी एका रुगणालयातून दुसर्‍या रुग्णालयात उपचारार्थ नेण्यासाठी अ‍ॅब्युलन्स ही महत्वाची भूमिका निभावते.

अपघातग्रस्त ठिकाणाहून रग्णाला उपचारार्थ रुग्णालयापर्यंत नेण्यासाठी अ‍ॅब्युलन्स ही महत्वपूर्ण ठरते. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाला या अ‍ॅब्युलन्स लवकरच मिळणार आहेत. जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्रांत 8 अ‍ॅब्युलन्स दाखल होत असल्याने आरोग्य विभागाला नवसंजीवनी मिळणार आहे.

अ‍ॅम्ब्युलन्स ठरणार आता, जीवनवाहिनी...

गेल्या काही महिन्यांपासून जिल्हयातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या अ‍ॅब्युलन्सची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेवर दुसर्‍या उपजिल्हा आरोग्य रुगणालयासह अन्य ठिकाणी रुग्णाला दाखल करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. यापूर्वी काही प्राथमिक आरोग्य केंद्रातून निघालेल्या अ‍ॅब्युलन्स रस्त्यातच खराब झाल्यामुळे रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी मोठी पंचायत झाली होती. अशा घटनामुळे रुग्णाच्या नातेवाईकांचा उद्रेकाचा सामना करावा लागला होता.

8 प्राथमिक आरोग्य केंद्रांत अ‍ॅब्युलन्स दाखल होणार

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातून दुसर्‍या उप आरोग्य केंद्र किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी रुग्णाला नेण्यासाठी अ‍ॅब्युलन्स गरजेची आहे. त्यासाठी मांडळ, वैजारपूर, अडावद, कजगाव, उंबरखेड, रांजणगाव, वाकोद, लोहारा या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवेसाठी या अ‍ॅब्युलन्स दाखल होणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com