अडीच वर्षांनंतर खलनायकाचा नायक ठरलो!

स्व.गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वार भूमिपूजनप्रसंगी धनंजय मुंडे यांचे प्रतिपादन
अडीच वर्षांनंतर खलनायकाचा नायक ठरलो!

जळगाव । jalgaon

जळगाव शहरात यापुर्वी मी दोन वेळा येऊन गेलो. मात्र त्यावेळी मला मेहरूणला कुणीही बोलावले नव्हते. राजकीय भूमिका बदलली म्हणून मी खलनायक ठरलो होतो. मात्र आज अडीच वर्षांनंतर का होईना मी खलनायक म्हणून नाही तर नायक म्हणून समाजासमोर आलो असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय विभाग मंत्री धनंजय मुंडे (Social Justice Minister Dhananjay Munde) यांनी आज येथे केले.

मेहरूण येथील समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेतर्फे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे (Late. Gopinathrao Munde) यांच्या नावाने प्रवेशद्वार निर्मितीचे भूमिपूजनप्रसंगी आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. ना. धनंजय मुंडे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, राज्यात दोनच नाथ होते, ते म्हणजे गोपीनाथ आणि एकनाथ.

हे दोघे वेगवेगळ्या जातीचे असले तरी त्यांच्यात कुटुंबाचे नाते होते. राज्याच्या कानाकोपर्‍यात भाजपा वाढविण्याचे काम लोकनेते स्व. गोपीनाथराव आणि एकनाथराव यांनी केले आहे. मी देखिल 20 वर्ष मुंडे साहेबांसोबत होतो. संघर्षातुन मिळालेल्या यशाची किंमत होऊ शकत नाही. मी देखिल दहा वर्ष संघर्ष केला आहे. राजकीय भूमिका वेगळी घेतली म्हणून मी त्यावेळी अनेकांना खलनायक वाटत होतो. अनेकांनी त्यावेळी मला शिव्याशापही दिले. मात्र आज त्याच समाजासमोर मी नायक म्हणून उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

स्व.मुंडे साहेबांच्या लोकसभा लढविण्याला होता विरोध

सन 2009 मध्ये स्व. मुंडे साहेबांनी लोकसभा लढवु नये असा माझा आग्रह होता. त्यावेळी त्यांनी ऐकले असते तर 2014 च्या निवडणुकीचे चित्रच वेगळे राहीले असते असेही ना. धनंजय मुंडे म्हणाले. मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याची जबाबदारी नियतीने माझ्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याचेही ते म्हणाले. ऊसतोड मजूरांनी मुंडे साहेबांवर सर्वाधिक प्रेम केले. त्यांच्यामुळेच ऊसतोड मजूरांचे महामंडळ तयार झाले आणि त्यातून ऊसतोड मजूरांसाठी 20 रूपये ठेवले जात आहे. मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर हे महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे राहु द्यावे अशी मागणी केली होती. या विभागाच्या माध्यमातून ऊसतोड मजुरांसाठी काम सुरू ठेऊन मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करणार असल्याची ग्वाही ना. मुंडे यांनी दिली.

मला वारस म्हणू नका अन्यथा दुसरीकडे राग येइल

कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी धनंजय मुंडे यांचा स्व. गोपीनाथरावांचे ‘वारस’ म्हणून उल्लेख केला. त्यावर ना. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भाषणात ‘मला वारस म्हणू नका अन्यथा दुसरीकडे राग येईल’ अशा शब्दात पंकजा मुंडे यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला. दरम्यान जेव्हा जेव्हा जळगावला येईल तेव्हा तेव्हा मेहरूणमध्ये नक्की येणार असा शब्दही मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना दिला.

Related Stories

No stories found.