
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
मविप्र छापेमारी प्रकरणात तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण (Adv. Praveen Chavan) यांना शहर पोलिसांनी रविवारी अटक केली होती. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. तीन वकीलांसह स्वत: संशयित अॅड. चव्हाण यांनी न्यायालयात (sent to jail) युक्तीवाद करीत आपली बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने अॅड. चव्हाणांची कारागृहात रवानगी केली.दरम्यान, बचाव पक्षकाडून चव्हाणांच्या जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर आज कामकाज होणार आहे.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे पदाधिकारी निलेश भोईटे यांच्या तक्रारीवरुन अॅड. विजय पाटील व किरणकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध दि. 7 ऑक्टोंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात तेजस मोरे यांनी दिलेला जबाब आणि ऑडीओ क्लिपच्या आधारावर अॅड. चव्हाण यांना आरोपी करण्यात आले होते. त्यानुसार अॅड. चव्हाण हे खंडणीच्या गुन्ह्यात एसआयटी पथकासमोर हजेरी लावण्यासाठी आले असता, रविवारी रात्री त्यांना शहर पोलिसांनी अटक केली.
त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात सरकार पक्षाकडून संशयित अॅड. चव्हाण यांनी अॅड. विजय पाटील यांच्यासोबत निलेश भोईटे व साक्षीदार यांच्याविरुद्ध पुरावे निर्माण करण्यासाठी कट रचला असून तेच मुख्यसूत्रधार असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. कट रचतांना त्यांच्यामध्ये झालेले कॉलवरील संभाषण आणि साक्षीदार तेजस मोरे याने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये व्हीडीओ व ऑडीओ रेकॉर्डींग करण्यात आले असल्याचे सरकारपक्षाचे वकील अॅड. अविनाश पाटील यांनी न्यायासमोर मांडले.
या मुद्दांवर मांडला युक्तीवाद
रेकॉर्डींमध्ये ड्रग्ज आणि रक्ताने माखलेला चाकूचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच यातील संशयित अॅड. चव्हाण यांचा आवाज त्यांचाच आहे का याची तपासणी करण्यासाठी त्यांच्या आवाजाचे नमूने घेवून तज्ज्ञ समितीकडून त्याची तपासणी करावी, तसेच तपासकामी आलेल्या पथकाच्या जेवणाचे बिल कोणी व कसे भरले यावर सरकारपक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला.
अॅड. चव्हाणांसह तिघांकडून युक्तीवाद
सरकारपक्षाकडून युक्तीवाद मांडत पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. परंतु बचाव पक्षाने हा संपुर्ण युक्तीवाद खोडून काढत अॅड. चव्हाण यांना न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचे न्यायासमोर मांडले. त्यानंतर मूळ फिर्यादीच्या वकीलांनी देखील यावर युक्तीवाद केला. त्यानंतर शेवटी अॅड. प्रवीण चव्हाण यांनी आपले म्हणणे न्यायालयासमोर मांडत युक्तीवाद केला. सुमारे अडीच तास चार जणांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अॅड. चव्हाणांची न्यायालयीन कोठडीत रवागनी केली.
जामीन अर्जावर आज कामकाज
न्यायालयाने अॅड. चव्हाण यांची न्यायालयीन कोठडीत रवागनी केल्यानंतर त्यांचे वकील अॅड. गोपाळ जळमकर यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. परंतू न्यायालयाने तपासधिकार्यांनी या अर्जावर आपले म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार मंगळवारी अॅड. चव्हाणांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.