काकाचा खून करणार्‍या संशयित पुतण्याच्या मुसक्या आवळल्या

स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक, १२ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी
काकाचा खून करणार्‍या संशयित पुतण्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव - jalgaon

आंबेडकर नगर येथे राजू पंडीत सोनवणे वय ५५ यांचा त्यांच्या पुतण्यानेच खून केल्याची घटना १२ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास समोर आली होती. तब्बल महिनाभरापासून चकवा देत असलेला संशयित पुतण्या सुरज उर्फ विशाल अनिल सोनवणे (३३) रा. आंबेडकर नगर जुने जळगाव याला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवार, ९ ऑक्टोंबर रोजी पहाटे दीड वाजता (Jalgaon Local Crime Branch) जळगावातील भोईटे नगर येथून अटक केली आहे. दरम्यान काका नेहमी मारहाण करायचे, रागवयाचे म्हणून त्यांचा खून केल्याची कबूली सुरज सोनवणे याने पोलिसांसमोर दिली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर मयत राजू सोनवणे यांचा मुलगा अश्‍वधोष याने फिर्यादीत व्यक्त केलेल्या संशयानुसार संशयित सुरज उर्फ विशाल सोनवणे यास अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी शनिपेठ पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला सुचना तसेच मार्गदर्शन केले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे किरण कुमार बकाले यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील यांचे पथक नियुक्त केले होते. पथकाकडून ज्या ज्या ठिकाणी संशयित सुरजचे नातेवाईक राहतात. त्या जळगावसह मुंबई, नवी मुंबई, नाशिक, चाळीसगाव व भुसावळ याठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. मात्र मिळून आला नव्हता. तब्बल महिन्याभरापासून संशयिताचा शोध सुुुरु होता. फरार संशयित सुरज हा शनिवारी जळगाव शहराच्या भोईटे नगर भागातील रेल्वे मालधक्का परिसरात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पहाटे दीड वाजेच्या सुमारास पथकाने सापळा रचून संशयित सुरजला अटक केली.

Related Stories

No stories found.