
पाचोरा - प्रतिनिधी pachora
महाविकास आघाडीने बाजार समितीची निवडणूक (Election of Market Committee) लढवली होती. १५ पैकी नऊ जागा आम्हाला मिळाल्या होत्या. परंतु दोन जागेंवर सत्तेचा दुरुपयोग आणि निवडणूक अधिकाऱ्यांवर राजकीय दबावाखाली निकाल विरोधात दिल्याने आमच्याकडे सात जागा राहिल्या. बाजार समितीची निवडणूक लढतांना मार्केटच्या जागा ज्यांनी विकत घेतल्या त्यांच्या विरोधात आम्ही प्रचारात मते मागितली म्हणून समितीच्या सत्तेत किंवा सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या त्या दोन सचालकांचा पाठींबा महाविकास आघाडीने नैतिक मूल्य जोपासत नाकारला असे पत्रकार परिषदेत माजी आमदार दिलीप वाघ यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी तटस्थ का राहिली ही भूमिका स्पष्ट केली.
तर उबाठा सेनेच्या नेत्या वैशालिताई सुर्यवंशी यांनी आमदार किशोर पाटील यांच्यावर आरोप केले आहे कि, आमदार किशोर पाटील हे सत्तेचा दुरुपयोग करून निवडणूक अधिकारी यांचेवर राजकीय दबावतंत्राचा वापर करीत आहेत.भाजपचे स्वतंत्र गटाचे दोन संचालक अनुपस्थित रहावे यासाठी देखील वरिष्ठ पातळीवर दबाव आणला गेला असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीचे समिती संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.