आबासाहेब... सरकार आपलं आहे..

डिपीडीसीच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील- आ. चिमणराव पाटील यांच्यात पुन्हा वादाची ठिणगी
आबासाहेब... सरकार आपलं आहे..

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वीज बिल भरुन देखील ट्रान्सफार्मर (Transformer) मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील (Shiv Sena MLA Chimanrao Patil) यांनी आज जिल्हा नियोजन मंडळाच्या (District Planning Board) ऑनलाईन बैठकीत केली. त्यांनी तक्रार करताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांनी ‘आबासाहेब.....सरकार आपलं आहे, आपण समजून घेतलं पाहिजे, आपणच विरोधात बोलू तर कसं चालेल’अशा शब्दात आमदार चिमणराव पाटील यांना फटकारले. त्यामुळे पुन्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. हाच विषय धरत सत्ताधारी आ. किशोर पाटील ( MLA Kishore Patil) यांनी देखील पालकमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली.

जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी ऑनलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीसाठी सदस्यांना लिंकद्वारे जोडण्यात आले होते. त्यानुसार डिपीडीसीचे सर्व सदस्य व अधिकारी बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. बैठकीत महावितरणला जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून 22 कोटीचा निधी देण्यात आला आहे. असे असतांना जिल्ह्यात बिले भरूनही शेतकर्‍यांना ट्रान्सफार्मर मिळत नसल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनी बैठकीत केली.

त्यावर पालकमंत्र्यांनी आ. चिमणराव पाटील यांना ‘आबासाहेब सरकार आपलं आहे, समजून घ्या’ असे सांगत सत्ताधारी असल्याची आठवण करून दिली. तसेच राज्य शासनाने तीन पैकी थकीत एक बील भरल्यानंतर ट्रान्सफार्मर देण्याविषयी परीपत्रक काढले असल्याचेही पालकमंत्र्यांनी आमदार चिमणराव पाटलांना सांगितल्याने दोघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे.

शहरातील रस्त्यांसाठी लवकरच डीपीआर

नियोजन समिती सदस्य नितील लढ्ढा यांनी शहरातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याची दुरूस्ती व्हावी आणि रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब हटवुन भुयारी केबल टाकाव्या अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना विचारले असता शहरातील रस्त्यांसाठी लवकरच डीपीआर तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तातडीने कामांचे प्रस्ताव द्या- ना. पाटील

जिल्हा नियोजन समितीमार्फत वितरीत करण्यात आलेला निधी मार्च अखेरपर्यंत 100 टक्के खर्च करण्याच्या सुचना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केल्या. तसेच जी कामे अपुर्ण आहेत त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. कोरोनाची तिसरी लाट येऊ घातली असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com