जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव । Jalgaon । प्रतिनिधी

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानकासमोरील अतिक्रमण काढण्याबाबत अनेकवेळा तक्रारी निवेदन देवून ही कोणतीही कारवाई होत नसल्याने, तक्रारदार तरूणाने शुक्रवार दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर पेट्रोल (Petrol) टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू पोलीसांच्या सतर्कतेने हा अनुचित प्रकार टळला असून पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील भूषण नामदेव पाटील या तरूणाने गावातील बस स्टँड समोर असलेल्या गावठाण गट क्रमांक 131 समोरचे अतिक्रमण काढण्यासाठी तो पाठपुरावा करत आहे. या संदर्भात त्याने अनेकदा निवेदने देऊन देखील स्थानिक ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही.

या संदर्भात कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा भूषण पाटील याने दिलेला होता.

दिलेल्या तक्रारी, निवदेनाची कोणतीही दखल जिल्हा प्रशासनाकडून न घेतली जात असल्याने शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास तक्रारदार भुषण पाटील याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात स्वत:च्या अंगावर पेट्रोलच्या कॅनमधून पेट्रोल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांमुळे वाचले तरुणाचे प्राण

जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी वेळीच धाव घेतल्याने तरूणाच्या हातातील पेट्रोलची कॅन आणि आगपेटी हिसकावून पुढील अनर्थ टळला आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, तरुणाला पोलिसांन ताब्यात घेतले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com