मारहाण करीत विषारी औषध पाजून तरुणाचा खून

चार संशयितांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
मारहाण करीत विषारी औषध पाजून तरुणाचा खून

जळगाव- Jalgaon

गल्लीतील जुन्या भांडणाच्या कारणावरून चेतन प्रकाश चौधरी (वय 23 रा. रामेश्वर कॉलनी) या तरुणाला बेदम मारहाण करून त्याला विषारी पदार्थ पाजून त्याचा खून केल्याची घटना दि. 11 रोजी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार संशयतांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील रामेश्वर कॉलनीत चेतन चौधरी हा तरुण वास्तव्यास होता. या तरुणावर मानसिक उपचार सुरू असून त्याचे गल्लीतील काही तरुणांसोबत भांडण झाले होते. याच कारणावरून दि. 11 रोजी तरुण चेतन याला गल्लीतील संशयित सचिन कैलास चव्हाण (वय २३), तुषार उर्फ सोन्या विजय पाटील (वय २४), कुंदन रवींद्र पाटील (वय ३०), सनी उर्फ फौजी बाळकृष्ण जाधव (वय ३६) सर्व रा. रामेश्वर कॉलनी यांनी बेदम मारहाण केली होती.

या मारहानीनंतर त्यांनी चेतनला काहीतरी विषारी पदार्थ पाजून त्याला गल्लीत आणून पुन्हा बेदम मारहाण केली होती. जखमी अवस्थेत असलेल्या चेतनला उपचारार्थ जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले असता त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान चेतनची प्राणजोत मालवली होती.

याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणाची एमआयडीसी पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर चेतनला बेदम मारहाण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी रात्री चौघं तरुणांविरुद्ध खुनाचा पुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com