
मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी -
चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन ऐवजी आता पुन्हा दि,४ जानेवारी २०२३ पासून पॅसेंजर गाडी धावणार आहे. चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन ही तांत्रीक दुरुस्तीसाठी अनिश्चित कालावधीसाठी भुसावळ येथे रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे चाळीसगाव-धुळे पॅसेंजरचा हॉर्न प्रवाशाना आता ऐकू येणार आहे.
कोविड मुळे तब्बल अडीच वर्षांपासून बंद असलेली चाळीसगाव-धुळे पॅसेजर ऐवजी दि, १३ डिसेंबर २०२१ पासून चाळीसगाव-धुळे रेल्वे लाईनवर मेमू ट्रेन सुरु करण्यात आली होती. सुरुवातीच्या चार महिने या ट्रेनच्या दोनच फेर्या असल्यामुळे प्रवशांचे प्रचंड हाल होत होत. प्रवाशांच्या मागणीमुळे ११ एप्रिल २०२२ पासून दोन फेर्या सुरु करण्यात आल्या आणि ट्रेन पूर्वीप्रमाणेच दिवसातून चार वेळा धावू लागली. चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन गेल्या वर्षभरापासून चाळीसगव-धुळे रेल्वे मार्गावर धावत होती. प्रवशांचा प्रतिसाद देखील चांगला आहे. परंतू या गाडीची तांत्रीक देखभाल करण्याची व्यवस्था चाळीसगाव येथे नसल्यामुळे ही गाडी आता अनिश्चित काळासाठी भुसावळ डिव्हीजनला रवाना करण्यात आली आहे. तेथून ही गाडी ज्या ठिकाणाहुन तयार झाली, तेथे जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच आजपासून(दि,४) पूर्वी प्रमाणेच चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेन ऐवजी चाळीसगाव-धुळे पॅसेजर गाडी धावणार आहे. पूर्वीप्रमाणेच पॅसेजरचे डब्बे (रॅक) चाळीसगाव स्थानकात दाखल झाले आहेत. परंतू या डब्ब्यांमध्ये रेल्वेच्या नियमावलीप्रमाणे शौचालय बंद राहणार आहेत. तर भाडे मात्र मेमू ट्रेनसारखेच आकारले जाणार असून मेमूच्या वेळेवरच ही पॅसेजर विजेवर धावरणार असल्याची माहिती मिळाली आहे.
टवाळखोर प्रवशांमुळेे मेमूचे नूकसान-
चाळीसगाव-धुळे मेमू ट्रेनचे काही टवाळखोर प्रवशांमुळे बरेच नूकसान झाले आहे. मेमू ट्रेनच्या कांचा फोडणे, सीट फाडणे, शौचालयातील आरसे चोरुन नेणे तसेच हॅन्डल तोडणे आदि असे उद्योग गेल्या वर्षभरात वारंवार काही टवाळखोर प्रवाशांनी केले आहेत. त्यामुळे या मेमू ट्रेनला बर्याच तांत्रीक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आता ही ट्रेन अनिश्चित कालावधीकरीत दुरुस्तीसाठी जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांकडून मिळाली आहे. सद्यातरी रविवारी देखील ही गाडी बंदच राहणार आहे, परंतू येत्या काही दिवसांमध्ये पूर्वीप्रमाणेच ही गाडी रविवारी देखील नियमित सुरु करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.