
जळगाव । प्रतिनिधी Jalgaon
सायंकाळच्या सुमारास रायसोनी नगरात घर पाहण्यासाठी गेलेल्या सनी विकास सोनार यांच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी सायंकाळी पावणेसहा ते पावणेआठ वाजेच्या सुमारास अयोध्या नगरात घडली. याठिकाणाहून चोरट्यांनी रोख रकमेसह 3 लाख 97 हजार 915 रुपयांचा सोने-चांदीचे दागिने लांबवून नेले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अयोध्या नगरातील उषा ई रेसीडेन्सी मध्ये सनी विकास सोनार हे वास्तव्यास असून ते टेफ्लो इंजिनिअर कंपनीत टीम लिडर म्हणून नोकरीस आहेत. सोमवारी सायंकाळी 5.45 वाजेच्या सुमारास सनी हे पत्नी व दोघ मुलांना घेवून रायसोनी नगर येथे घर पाहण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोन तासानंतर म्हणजेच पावणेआठ वाजेच्या सुमारास ते घरी परतले असता, त्यांना घराच्या मुख्यदरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जावून बघितल्यांतर बेडरुमधील लाकडी कपाट उघडे होते. कपाटातील लॉकर तोडून चोरट्यांनी त्यामध्ये ठेवलेले सोने व चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोेलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा लांबविला ऐवज
चोर÷ट्यांनी सोनार यांच्या घरातून 1 लाखांची रोकड, सोन्याची पोत, मणी, सोन्याचे पेंडल, अंगठी, सोन्याचा तुकडा, चांदीचे बिछवे, आकडा, पायातील साखळ्यांचे जोड, जोडवे व बाळाच्या पायातील वाडे असा एकूण 3 लाख 97 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
अपार्टमेंटमधील बंद घर चोरट्यांचे लक्ष्य
अपार्टमेंटमध्ये अनेक घर असल्याने याठिकाणी येणार्या जाणार्यांची वर्दळ सुरुच असते. यातच चोरटे बंद घरात चोरटे डल्ला टाकून याठिकाणाहून लाखोंचा ऐवज लंपास करीत असल्याची ही अयोध्या नगरातील दुसरी घटना आहे. त्यामुळे अपार्टमेंटमधील बंद घर हेच चोरट्यांचे लक्ष्य असल्याचे दिसून येत आहे.