जळगाव jalgaon । प्रतिनिधी
पत्नीच्या प्रसुतीसाठी आजीसोबत भुसावळला जाणार्या कारला मागून भरधाव वेगाने जाणार्या महामंडळाच्या एस.टी बसने जोरदार (speeding bus) धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की कार समोर चालणार्या टँकरवर जावून धडकल्याची घटना मंगळवारी दुपारी महामार्गावरील हॉटेल गौरवसमोर घडली. या अपघातात (accident) कारचा चुराडा (car crushed) झाला असून वेळीच एअरबॅग उघडल्याने कारमधील तिघे बालंबाल बचावल्याने देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय यावेळी दिसून आला.
एरंडोल येथे विशाल प्रवीण शिंपी हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास असून बुधवारी त्याच्या पत्नीची प्रसुती होणार असल्याने तो मंगळवारी दुपारी आजी लताबाई आणि मित्र प्रसाद पाटील यांच्यासह कारने भुसावळला जाण्यासाठी (एमएच.05.बीजे.3279) क्रमांकाच्या कारने निघाले. दुपारी 3 वाजेच्या सुमारास जळगाव-नशिराबाद महामार्गावरील हॉटेल गौरवजवळून जात असताना समोरील टँकर अचानक हळू झाल्याने कारचालकाने देखील कार हळू केली. परंतु मागून भरधाव वेगाने येत असलेल्या महामंडळाच्या एसटी बसने चारचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की कार समोरील टँकरवर आदळल्या गेल्याने कारचा दोन्ही बाजूने चुराडा झाला.
एअरबॅग उघडल्याने तिघे बचावले
महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात कारचा चुराडा झाला. तसेच कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे कारमधील बसलेल्या तिघांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाही. अपघातानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून कारमधील तिघांना बाहेर काढले.
महामार्गावरील वाहतुक ठप्प
अपघातानंतर महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प होवून सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. काही वेळानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.