विद्यापीठाच्या प्राधिकरणासाठी 97 टक्के मतदान

विद्यापीठाच्या प्राधिकरणासाठी 97 टक्के मतदान

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) विविध प्राधिकरणासाठी (various authorities) रविवारी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील 19 मतदान केंद्रातील 25 बुथवर सरासरी 97 टक्के मतदान (voting) झाले. सर्व मतदान केंद्रावर अत्यंत शांततेत मात्र उत्साहाने मतदान झाले. या निवडणुकीतील सर्वच उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले आहे. दरम्यान,मंगळवार दि. 10 जानेवारी रोजी विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

विद्यापीठाच्या अधिसभा, विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या प्राधिकरणासाठी ही निवडणूक अतिशय चुरशी होत आहे. रविवार दि.8 जानेवारी रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 ही मतदानाची वेळ होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांतील 19 मतदान केंद्रातील 25 बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. सगळीकडे शांततेत मतदान झाले. सकाळी 10 वाजेपर्यंत बहुसंख्य मतदान केंद्रावर 25 टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. कुलगुरू प्रा.व्ही. एल. माहेश्वरी यांनी सकाळी 9 वाजता जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयातील मतदान केंद्राला भेट दिली. या मतदान केंद्रातील तिन्ही बुथवर जावून त्यांनी पाहणी केली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत असलेल्या मतदान केंद्राला देखील त्यांनी भेट दिली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे व कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील काही मतदान केंद्रांना भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रातील चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

विद्यापीठातील विद्यापरिषदेच्या 4 जागांसाठी 9 उमेदवार आहेत. विविध विषयांच्या 13 अभ्यासमंडळांसाठी 60 उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीत 57 विद्यापीठ अध्यापकांपैकी 56 अध्यापकांनी 98 टक्के मतदान केले. 57 प्राचार्यांपैकी 56 प्राचार्यांनी 98 टक्के मतदान केले. 1 हजार 871 महाविद्यालयीन अध्यापकांपैकी 1 हजार 808 अध्यापकांनी 97 टक्के तर 84 व्यवस्थापन प्रतिनिधींपैकी 79 (94 टक्के) मतदान केले. व्यवस्थापन प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मंगळवार दि. 10 जानेवारी रोजी विद्यापीठ परिसरातील कर्मचारी भवनात सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

अभ्यासमंडळांच्या 490 मतदारांनी बजावला हक्क

विद्यापीठाच्या 13 अभ्यासमंडळांसाठी 496 मतदारांपैकी 490 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सरासरी एकूण मतदान 95 टक्के झाले होते. यावेळी त्यामध्ये वाढ झालेली दिसून आली.

अधिसभेच्या 22 जागांसाठी 46 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

अधिसभेसाठी व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटातून 4 जागांसाठी 6 उमेदवार, महाविद्यालय अध्यापकांच्या गटातून 10 जागांसाठी 26 उमेदवार, प्राचार्यांच्या गटातून 5 जागांसाठी 7 उमेदवार, विद्यापीठ अध्यापकांच्या गटांमधुन 3 जागांसाठी 7 उमेदवार अशा एकुण अधिसभेच्या 22 जागांसाठी 46 उमेदवार उभे आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

कुलगुरुंची केंद्रावर पाहणी

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यापीठाने विभागीय अधिकारी, केंद्र अध्यक्ष, मतदान अधिकारी व मतदान सेवक अशा एकूण 182 जणांच्या नेमणुका केलेल्या आहेत. खान्देशातील 19 केंद्रामध्ये 25 बुथची व्यवस्था मतदारांसाठी करण्यात आली होती. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी काम पाहिले. दरम्यान, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, मुळजी जेठा महाविद्यालय केंद्रावर कुलगुरू प्रा.व्ही. एल. माहेश्वरी यांनी भेट देऊन पाहणी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com