आठ मन लाकडांच्या आहुतीत 80 वर्षाचा इतिहास पुसला जातो

द्वारकाई व्याख्यानमाला : कवी ध.सु.जाधव यांचे प्रतिपादन ; उद्या प्रशांत केंदळे यांचे व्याख्यान
आठ मन लाकडांच्या आहुतीत 80 वर्षाचा इतिहास पुसला जातो

भुसावळ । Bhusawal । प्रतिनिधी

मोबाईलच्या (Mobile) या आभासी जगात तरूणाई माध्यमांच्या इतक्या आहारी गेली आहे की, कुटूंबातील जेवणाच्या टेबलवरील संवाद देखील संपला आहे. हा संवाद हरवायला नको, मोबाईलचा वापर व्हावा पण अतिरेक नको. घरातील वृध्द व्यक्तींशी संवाद साधा ही माणस आपल्यासाठी माहितीचा खजिना आहे. घरातील वृध्द व्यक्तीचे निधन झाले म्हणजे आठ मन लाकडांच्या आहुतीमध्ये 80 वर्षाचा इतिहास पुसला जातो, हा इतिहास आपल्या पिढीने जपून ठेवायला हवा, असे प्रतिपादन प्रख्यात कवी, मराठी निवेदक ध.सु. जाधव (औरंगाबाद) यांनी केले.

श्री.जाधव हे स्व.द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जय गणेश फाऊंडेशन संचलित द्वारकाई या फिरत्या व्याख्यानमालेत दुसरे पूष्प गुंफतांना बोलत होते. ‘चला संवादी होऊ या’ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफताना कवी जाधव बोलत होते. शहरातील रा.गं. झांबरे विद्यालयात हे पुष्प गुंफण्यात आले. अध्यक्षस्थानी संचालक ए.एन. शुक्ल होते. विचार मंचावर सचिव बी.जी. सरोदे, संचालक जे.एच. चौधरी, प्राथमिक विभागाचे चेअरमन संजय पाटील, संचालक डॉ.के.जी. झांबरे, सल्लागार एस.आर. झांबरे होते. शाळेतर्फे मुख्याध्यापक एस. बी. कुमावत यांनी वक्त्यांचा सत्कार केला. प्रास्ताविक जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केले. सूत्रसंचालन मनीष गुरचळ, आभार समन्वयक गणेश फेगडे यांनी मानले.
शेरोशायरी आणि कवितांना भरभरून दाद
कवी जाधव यांनी सुरुवातीलाच यामिनी दळवी यांची ‘आई असते ओली माती’ ही कविता सादर करून रसिकांचे लक्ष वेधले. त्यानंतर शायर मुनव्वर राणा यांचा
‘ए अंधेरे देख मुँह तेरा काला हो गया,
माँ ने मेरे आँखे खोल दी
घर में उजाला हो गया’

हा शेर खास शैलीत सादर करून टाळ्या मिळवल्या. या शेरमधून त्यांनी आईची महती वर्णन केली. गुरु ठाकूर यांची
‘असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर,
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर’

ही कविताही सादर केली.
‘रूमाल’ कवितेतून मांडलं शेतकर्‍यांचं दु:ख
‘रूमाल’ नावाची कविता सादर केली. त्यातील ‘कमाल आहे वर्षानुवर्ष माझ्या बा च्या गळ्यात फाटकाच रुमाल आहे’ या ओळी काळजाचा ठाव घेणार्‍या ठरल्या. पोट खपाटीला गेलेला बाप घामाच्या धारांनी अंघोळ करतो. राबराब राबून धनधान्याच्या राशी पिकवतो पण तरीही त्याच्या गळ्यातील फाटका रुमाल बदलत येत नाही हे त्यातून अधोरेखीत केले.
ग्रामगीता, अग्निपंख ही पुस्तके जरूर वाचा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला समाज प्रबोधनाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी ग्रामगीता घरोघरी वाचली गेली पाहिजे. ‘अग्निपंख’, ‘आमचा बाप अन् आम्ही’ अशी पुस्तके विद्यार्थ्यांनी जरूर वाचली पाहिजे, असे आवाहनही कवी जाधव यांनी केले. गझलकार आबेद शेख यांच्या ‘यार हो क्षमा करत चला, माणसे जमा करत चला’ या ओळी त्यांनी सादर केल्या. माणसं जोडण्याचा व चांगल्या विचारांची माणसं पेरण्याचा संदेश त्यांनी दिला. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com