51 हजार शासकीय कर्मचार्‍यांचा बेमुदत एल्गार

51 हजार शासकीय कर्मचार्‍यांचा बेमुदत एल्गार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

नवीन पेन्शन योजना (New Pension Scheme) रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, या मागणीसाठी महसूल विभाग, जिल्हा परिषद आणि वेगवेगळ्या विभागात काम करणार्‍या शासकीय,निमशासकीय कर्मचार्‍यांनी (employees) संपाचे हत्यार उपसले आहे. अभी नहीं तो, कभी नही, एकच मिशन, जुनी पेन्शनचा नारा देत जिल्ह्यातील सर्वच विभागातील 51 हजार कर्मचारी या बेमुदत संपात (Indefinite strike) सहभागी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.

जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटना, महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर तसेच जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी या सर्व प्रवर्ग संघटनांची 14 मार्च रोजी न्याय हक्काच्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. नवीन पेन्शन योजना एनपीएस रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, कंत्राटी व योजना कामगार प्रदिर्घकाळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देऊन त्यांची सेवा नियमित करा, सर्वच रिक्त पदे तसेच चतुर्थ श्रेणी व वाहन चालक कर्मचार्‍यांच्या पदभारती केलेला मज्जाव तत्काळ पाठवा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, मागासवर्गीय कर्मचार्‍यांचे सध्या रोखलेली पदोन्नती सत्र तात्काळ सुरु करण्यात यावी,

शिक्षण सेवक, ग्रामसेवक आदींना मिळणार्‍या मानधनात वाढलेल्या महागाईचा विचार करून वृद्धी करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटना, महसूल कर्मचारी संघयना,जळगाव जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना, आणि महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी महासंघ, राज्य शासकीय निमशासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक वर्ग तीन कर्मचारी संघटना, कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटना, प्राथमिक शिक्षक समिती,जि.प.कर्मचारी युनियन शाखा जळगाव, जि. प.लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना,जि.प.अभियंता संघटना जळगाव, जि.प. लेखा कर्मचारी संघटना, अल्पसंख्यांक कर्मचारी अधिकारी संघटना, परिचर कर्मचारी संघटना, पाणीपुरवठा कर्मचारी संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक संघटना आदी संघटना मिळून जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय समितीने एकच मिशन, जुनी पेन्शन मिळाली पाहिजे,अशी घोषणाबाजी करीत सर्व संघटना बेमुदत संपात एकजुटीने सहभागी झाल्या होत्या.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रुग्णालय यासह जिल्ह्यातील सर्वच संघटनांनी एकच मिशन जुनी पेन्शनच्या हक्कासाठी संपात सहभाग घेतला. दुपारनंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मगन पाटील, अमर परदेशी , बी.एम.चौधरी, दिलीप बारी, शैलेंद्रसिंग परदेशी, सर्जेराव बेडीस्कर, व्ही. जे. जगताप, योगेश न्नवरे, विलास पवार, गोविंदा पाटील, नितीन चौधरी, डी.एन.गोहिल, हेमंत नारखेडे, राहुल पाटील, व्ही.एन.तायडे, एच.एच.चव्हाण, व्ही.डी.नाईक, यशवंत जडे, लढाप्रमुख महेंद्र सोनवणे, अमित पाटील आदी उपस्थित होते.

कर्मचारी हक्काविषयी जागृती

जुन्या पेन्शनचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. या ऐतिहासिक बेमुदत संपात सरकारी, निमसरकारी, कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समिती, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी वर्ग-ड कर्मचारी महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना,प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती,माध्यमिक व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचारी संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, महापालिका, नगरपालिका,नगरपरिषद कर्मचारी संघटना,एन. मुक्टो या सर्व संघटना सहभागी होऊन आज संप पुकारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटनेचे अध्यक्ष मगन पाटील,सरचिटणीस अमर परदेशी यांच्यासह पदाधिकार्‍यांनी संपकरी कर्मचार्‍यांना आपल्या हक्काविषयी जागृत केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट

जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महसूल विभाग आणि इतर विभागातील कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने या कार्यालयामध्ये कामकाज ठप्प झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेसह इतर कार्यालय आणि परिसरात शुकशुकाट दिसून आला.

जि.प.संघटना एकवटल्या

जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचारी (वर्ग-3) हे आजपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत त्यात सर्व प्रवर्ग संघटना एकवटल्या असून संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. त्यात तालुकास्तरावरील सर्व कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या संपाप्रसंगी समितीचे डी.एस.पाटील, अनिल सुरडकर, योगीराज मराठे, सलिम पटेल, जिजाबराव पाटील, शकील देशपांडे यांनी संघटनेचे महत्व व संपाबाबतचे ध्येयधोरणे कर्मचार्‍यांंना पटवून दिले आहे. या ऐतिहासिक संपात आजपर्यत सर्व प्रवर्ग संघटना सामील झाल्या नव्हत्या. परंतु आजच्या संपात सर्व प्रवर्ग संघटनांनी हिरीरीने सहभाग घेतला आहे. संप यशस्वी करण्यासाठी महेश पाटील, अनिल भदाणे, किरण पराशर, राम घोरपडे, भूषण तायडे, नदिम मिर्झा, संजय पाटील, संजय शिंदे, विजय निकम, प्रशांत तायडे, भरत चौधरी यांनी सक्रीय सहभाग घेतला.

शिक्षक भारतीचे निवेदन

जुनी पेन्शनच्या मागणी आणि संपाबाबत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना शिक्षक भारतीतर्फे शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील यांच्यासह पदाधिकार्‍यांनी निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील, अजयकुमार पाटील, पंकज गरुड, लोकेश पाटील, कल्याण पाटील, सुशील पाटील, स्वप्निल महाजन, समाधान पाटील, प्रमोद जाधव, मुकेश पाटील, माधवी वाघ, शीतल चौधरी, वानखेडे, अर्चना पाटील, निलिमा चव्हाण व इतर उपस्थित शिक्षक बंधूभगिनी उपस्थित होते.

वैद्यकीय महाविद्यालयाचे निदर्शने

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह रुग्णालयातील सुमारे 50 कर्मचार्‍यांनी बेमुदत संपत सहभाग घेतला आहे. मंगळवारी सकाळी अधिष्ठाता कार्यालयाबाहेर महाविद्यालय व रुग्णालयातील कर्मचार्‍यांनी एकत्र येत घोषणा दिल्या. यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी संप न करता, फक्त पाठिंबा देऊन कामावर या असे आवाहन केले. मात्र त्यानंतरही कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला आणि सार्वत्रिक मोर्चेकर्‍यांमध्ये सहभागी झालेत. मोर्चात विजय जगताप, गोपाल साळुंखे, दिलीप मोराणकर, जे. एस. गवळी, समीर देवसंत, गणेश घुगे, नरेंद्र पाटील, गणेश धनगर, सूर्यकांत वसावे, देविदास गायकवाड, शीतल राजपूत, विजया बागुल, मंगेश जोशी, क्षितिज पवार, शामकांत दुसाने, विलास वंजारी, जे. एस. शिंदे, अनिल अवसरमल, संतोष टकले, प्रमोद वानखेडे, तुषार निळे, शिवकुमार पदरे, साहेबराव कुडमेथे आदी उपस्थित होते.

घोषणांनी परिसर दणाणला

एकच मिशनफ जुनी पेन्शन, हमारी मांगे पुरी करो, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, हम सब एक हे, हमारी युनियन हमारी ताकद, राज्य कर्मचारी संघटनेचा विजय असो..आदी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणला होता. सर्वच शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी आजपासून सुरू झालेल्या बेमुदत संपात सहभाग घेतल्याने, शासकीय कार्यालये ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर जिल्हा परिषद महासंघ समितीच्या निर्णयानुसार राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन (ओपीएस) योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी सर्वच सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. मागण्यांबाबत प्रचंड घोषणाबाजी केली.

काळ्या फिती लावून रुग्णसेवा

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्यावतीने मंगळवारी सकाळी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत जिल्हा परिचारिका संघटना अध्यक्ष जयश्री जोगी यांनी माहिती दिली. प्रसंगी, जुनी पेन्शन, एकच मिशन मजुनी पेन्शन मिळालीच पाहिजेफ अशा घोषणा देण्यात आल्या. रुग्णालयात आधीच परिचारिकांच्या जागा रिक्त आहेत. त्यात, साथीच्या आजारांमुळे नागरिक हैराण आहेत. त्यामुळे रुग्णांच्या हिताचा विचार करून रुग्णालयात येणार्‍या आपत्कालीन रुग्णांचा विचार करिता परिचारिकांनी काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांचे कर्मचार्‍यांनी संपाला पाठिंबा दर्शवित कामकाज केले.

मनपाचा सहभाग नाही

जळगाव महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी राज्यव्यापी शासकीय कर्मचार्‍यांच्या संपात सहभाग घेतला नाही. मनपाचा सर्व कर्मचारी आज आपल्या सेवेत कामावर असल्याची माहिती आस्थापना अधिक्षकांनी दिली. तसेच संपात सहभागी होवू नये यासाठी मनपा प्रशासनाने राज्यशासनाच्या आदेशानुसार आदेश आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी काढले आहे. यात अधिकार व कर्मचार्‍यांनी संपामध्ये सहभागी होवू नये. संपामध्ये सहभागी अथवा विना परवानगी गैरहजर राहिल्यास संबधित कर्मचार्‍यांवर गैरवर्तणूक समजून त्याचावर नियमानूसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. तसेच संपकाळात सर्व विभाग प्रमुखांनी आपले मुख्यालय वरिष्ठांच्या आदेशानुसार सोडू जाऊ नये तसेच कोणत्याही कर्मचार्‍यांची रजा मंजूर करू नये असे आदेश काढण्यात आले होते. त्यामुळे महापालिकेतील कर्मचार्‍यांनी संपात सहभाग घेतला नाही. मनपातील सर्व विभागाचे कामकाज आज सुरळीत सुरू होते. त्यामुळे इतर शासकीय कार्यालये बंद असतांना नागरिकांचे मनपातील कामे होत झाल्याने दिलासा व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com