
चाळीसगाव |Chalisgaon | प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष दोघा बालकांकडे गावठी कट्ट्यासह काडतुसे मिळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे .. या दोन गावठी कट्टयांसह 2 मॅ्नझीन व 10 जीवंत राऊंड देखील पोलीसांनी जप्त केली असून तिघांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे हवालदार योगेश बेलदार, पोना. दीपक पाटील, पोकॉ निलेश पाटील, विनोद खैरनार हे दि.21 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शहरात गस्त घालत असतांना हनुमानवाडी येथे रेल्वे उड्डाण पुलावर आले असता, हनुमान मंदिराच्या बाजुला बसलेले तिघे अल्पवयीन मुले पोलीसांना पाहून पळू लागले. त्यापैकी दोघांनी त्याच्या हातातील काहीतरी वस्तु मंदिराच्या मागील बाजुस भिंतीलगत अंधारात टाकून घरात पळाले.
हे दोघे खुनाच्या गुन्ह्यातील विधीसंघर्ष बालक असल्यामुळे पोलीसांचा त्यांच्यावर संशय आला.त्यामुळे त्यांनी मंदिराच्या मागील बाजुची पाहणी केली असता भिंतीलगत दोन गावठी बनावटीच्या मॅ्नझीनसहीत असलेल्या पिस्टल टाकलेल्या दिसल्या. त्यामुळे पोलीसांनी गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांना दिली. त्यांच्यासह पोना. राहूल सोनवणे, पोकॉ. विजय पाटील, महिला पोहेकॉ. विमल सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून गावठी बनावटीचे दोन पिस्टल (कट्टा),2 मॅ्नझीन व 10 जीवंत राऊंड ताब्यात घेतले.तसेच सदर पळून गेलेल्या मुलांचा त्यांच्या राहत्या घरी शोध घेऊन दोघांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आणले असता त्यांनी सदरचे गावठी पिस्टल त्यांच्या कंबरेला ठेवलेले होते असे सांगितले.
गावठी पिस्टलसह 2 मॅ्नझीन व त्यातील प्रत्येकी 5 असे एकूण 10 जीवंत राऊंड बेकायदेशीररित्या विना परवाना स्वत:च्या कब्जात बाळगतांना मिळून आल्याने तिघांच्या विरोधात पोना. दीपक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिनही मुलांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह भारतीय दंड संहिता कलम 34 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) 135 प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत असून तिघांच्याही शोध घेत आहेत.