
धुळे - Dhule - प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा परिषदेला पाच रुग्णवाहीका प्राप्त झाल्या आहेत. त्यांचे उद्घाटन आज जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्या हस्ते झाले. या रुग्णवाहिका ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राना देण्यात येणार आहे.
यावेळी तुषार रंधे यांनी शासनाचे आभार मानले. तसेच आणखी गाड्या आम्ही मागणी करणार आहोत. जेणेकरून कुठलेही प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णवाहिकेपासून वंचित राहू नये.
येणार्या काळात जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आणि चांगली असावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच करोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून नागरिकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही तुषार रंधे यांनी केले.
यावेळी सभापती मंगलाताई पाटील, सदस्य संग्राम पाटील, विरेंद्रसिंग गिरासे, संतोष नवले, ऐ. जे. तडवी, एस. जी. माळोदे, प्रकाश खोपकर, मनीष पाटील आदी उपस्थित होते.