दहिवेलला तरुणाचा बुडून मृत्यू

दहिवेलला तरुणाचा बुडून मृत्यू

धुळे । Dhule ।

जिल्ह्यात विविध घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात दहिवेल येथे तरूणाचा मासेमारी करतांना पाण्यात बुडून तर धुळ्यात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाले. तसेच एका तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.

दहिवेल (ता. साक्री) येथे राहणारे देवीदास लक्ष्मण सपकाळे (वय 36) हे दि.21 रोजी दुपारी मासेमारीसाठी पैलाड शिवारातील थोरपाडा येथील केटीवेअर बंधार्‍यात गेले होते. त्यादरम्यान ते पाण्यात बुडाले. याबाबत कळताच गावातील पवन संदानशिव, चंद्रकांत इशी, गोपाल निकवाडे यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने बिलाडी दोर टाकून देवीदास सपकाळे यांना पाण्याबाहेर काढले. त्यांना दहिवेल आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषीत केले. याबाबत साक्री पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

अपघातात दुचाकीस्वार ठार- अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाले. युवराज विठ्ठल वाघ (वय 58 रा. देवचंद नगर, रामनगर, संगमा चौक, गोळीबार टेकडी परिसर, धुळे) असे त्यांचे नाव आहे. ते दि.20 रोजी सायंकाळी दुचाकीने चाळीसगावकडून धुळ्याकडे येत होते. तेव्हा मोहाडी गावात अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात युवराज वाघ हे गंभीर जखमी झाल्याने ठार झाले. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याप्रकरणी जयेश युवराज वाघ यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरुणीची आत्महत्या- राईनपाडा, लव्हारदोडी (ता. साक्री) येथे राहणारी मिना धाकलु कामडे (वय 19) या तरुणीने घरात एकटी असतांना छतास लाकडी दांड्यास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. दि.21 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास ती गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आली. पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने तिला खाली उतरवुन पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करीत तिला मृत घोषीत केले. पिंपळनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com