यशवंत बागुल खूनप्रकरण # दोन मामेभावांनी केला आतेभावाचा खून

आरोपींना 24 तासात अटक, धुळे एलसीबी, तालुका पोलिसांची संयुक्त कामगिरी
यशवंत बागुल खूनप्रकरण # दोन मामेभावांनी केला आतेभावाचा खून

धुळे । dhule प्रतिनिधी

येथील मिलींद सोसायटीतील यशवंत सुरेश बागुल (वय38) याचा खून दोन मामेभावांनी केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी दोघा मामेभावांना अटक केली आहे.

तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत यशवंत बागुल याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून तसेच चाकूने वार करीत त्याचा खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत गुन्हेगारांचा छडा लावला. धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व धुळे तालुका पोलीसांनी दोघा आरोपींना जेरबंद केले आहे. दोन्ही आरोपी हे यशवंत बागुल यांचे मामेभाऊ असून त्यांनी पुर्ववैमनस्यातून खून केल्याची कबुली दिली आहे.

धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरखेडा येथे यशवंत बागुल हा दि.25 मे रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास पंकज राजेंद्र मोहिते याच्यासह उभंडनांद्रा गावात मजुर शोधुन परत येत असतांना बारीत (घाटात) एका दुचाकीवरून दोन व्यक्ती आले. त्यांनी यशवंत बागुल याला रस्त्यात थांबवून काहीतरी बोलायचे आहे असे निमित्त केले. बोलत असतांना एकाने त्याच्या कंबरेला असलेला गावठी कट्टा काढला व यशवंत बागुल याच्यावर गोळी झाडली. अन्य साथीदाराने त्याच्या पॅण्टच्या खिशातील धारदार चाकु काढून मानेवर व छातीवर वार केले. यात यशवंत बागुल जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधिक्षक रामराव सोमवंशी, धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरिक्षक हेमंत पाटील, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दत्तात्रय शिंदे, सपोनि. ताटीकोंडलवार, पोलीस उपअधिक्षक अनिल महाजन यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी दाखल झाले. पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला.

घटनास्थळावरुन एक रिकामे काडतूस, मॅग्निझन व इतर पुरावे पथकाच्या हाती लागले. याप्रकरणी मयत यशवंत बागूल यांच्या पत्नी आशाबाई बागुल यांच्या फिर्यादीवरून धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धुळे एलसीबी व धुळे तालुका पोलीसांचे संयुक्त पथक तपासासाठी तयार करण्यात आले. यात धुळे एलसीबीचे निरिक्षक हेमंत पाटील, पोसई. योगेश राऊत, पोसई.प्रकाश पाटील, असई. संजय पाटील, असई दिलीप खोंडे, पोहेकॉ.श्रीकांत पाटील, पोहेकॉ. प्रभाकर बैसाणे, पोना.योगेश चव्हाण, पोना. पंकज खैरमोडे, पोकॉ. किशोर पाटील, पोकॉ.महेंद्र सपकाळ, अमोल जाधव, सुनिल पाटील, चालक राजु गिते, कैलास महाजन आणि धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकातील सपोनि. विलास ताटीकोंडेलवार, पोसई. अनिल सुभाष महाजन, असई. सुनिल विंचुरकर, पोहेकॉ.प्रविण पाटील, पोहेकॉ. किशोर खैरनार, पोना. मुकेश पवार, पोकॉ. धीरज सांगळे, पोकॉ. कुणाल शिंगाणे, पोकॉ. अमोल कापसे, पोकॉ. राकेश मोरे, पोकॉ.प्रमोद पाटील, पोकॉ. नितीन दिवसे, पोकॉ.कांतिलाल शिरसाठ यांचा पथकात समावेश होता.

धुळे एलसीबी आणि धुळे तालुका पोलीस स्टेशन यांचा संयुक्त तपास पथकाने जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी राम सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली केला असुन अवघ्या 24 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला.

मानसिक त्रासामुळे केला खून

तपासा दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संशयित पंकज राजेंद्र मोहिते, आनंद लक्ष्मण मोहिते दोघे रा.उभंड नांद्रा, ता. धुळे यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. सदरचा गुन्हा हा मयताने वरील दोघा आरोपींना वेळोवेळी दिलेल्या मानसिक त्रासामुळे रागाच्या भरात केल्याचे त्यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com