
धुळे । dhule प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड वाढ झाली असून नद्या-नाले कोरडे झाले आहेत. पांझरा नदी पात्रातील पाणी आटल्यामुळे पांझरा काठावरील (Panzra banks) विंधन विहिरी व पाणी पुरवठ्याच्या योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामीण (villages) भागात वेळेवर विज पुरवठा होत नसल्याने जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई (Water scarcity) भासत आहे. त्यामुळे अक्कलपाडा धरणातील तीन हजार दशलक्ष फुट शिल्लक जलसाठ्यातून साडेतीनशे दलखफु जलसाठा हा विसर्जीत करून साक्री, धुळे, शिंदखेडा अमळनेर तालुक्यातील पांझरा काठावरील गावाना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन तिघही तालूक्यातील सरपंच यांच्या ठरावासह काल जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
याप्रसंगी माजी आ. प्रा.शरद पाटील हे उपस्थित होते. अक्कलपाडा धरण सन 2014 लाच पूर्ण क्षमतेने बांधून पूर्ण झालेले आहे. या धरणात दरवर्षी 72 टक्के जलसाठा साठवण्यात येतो. उर्वरीत अतिरिक्त पाणी उजव्या-डाव्या कालव्याद्वारे शेतीला व लघुबांधार्यात सोडण्यात येऊन या पाण्याचा सदुपयोग करण्यात येतो. शिवाय टंचाईच्या काळात हरण्यामाळ, नकाणे, गोंदूर, निमडाळे, खार्याचे धरण भरण्यात येते. यंदा अक्कलपाडा धरणातील जलसाठ्याच्या उजव्या-डाव्या कालव्याशिवाय कुठेही आवर्तण न दिल्यामुळे सुमारे तीन हजार दशलक्ष घनफुट जलसाठा अद्यापही धरणात शिल्लक आहे. हे पाणी 15 जून नंतर अतिवृष्टी झाल्यास सरळ समुद्रात सोडण्यात येते.
यंदा उन्हाळाही तिव्र असुन विहिरी आटायला सुरूवात झाली आहे. त्याच्यामुळे अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजना या अल्पकाळ चालविण्यात येत आहेत त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई भासत आहे. शिवाय जनावारांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन हिंडावे लागत आहे.
दरवर्षी मे महिन्यात किमान दोन आवर्तन अक्कलपाडा धरणातून दिली पाहिजेत, अशी शेतकर्यांनी मागणी असते. मात्र यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अनेक तांत्रिक बाबी पूर्ण कराव्या लागतात.त्यामध्ये धुळे नंदूरबार मुख्य कार्यकारी अधिकार्यांचा पाणी सोडण्याचा प्रस्ताव, तहसिलदार साक्री, धुळे, शिंदखेडा व अंमळनेर यांचा मागणी ठराव ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीचे पाणी पट्टी भरणा रक्कम व ग्रामपंचायतीचे पाणी मागणीचे ठराव, अशा तांत्रिक बाबी पुर्ण कराव्या लागतात. त्यानंतर जिल्हाधिकारी, प्रधान सचिव जलसंपदा व पाणी पुरवठा मंत्रालय यांच्याशी संपर्क साधून धुळे पाटबंधारे विभाग यांना पाणी सोडण्याचे आदेश देत असतात. यामध्ये मधल्या शेतकर्यांना व ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागते.
निवेदन उपजिल्हाधिकारी श्री. अतुर्लेकर यांनी स्विकारले. याप्रसंगी माजी प्रा.शरद पाटील यांच्यासह विविध गावाचे सरपंच ठराव घेऊन आलेले होते. त्यामध्ये मिलींद भावसार अजंदे, कैलास ठाकरे वालखेडा, लक्ष्मण मालचे वालखेडा, महेंद्रसिंग राजपूत भिलाली ता.अमळनेर, मिनाबाई राजपूत सरपंच, कळंभीर ता.अंमळनेर, के.बी.बडगुजर, पंकज पाटील, भावेश राजपूत, हंसराज पाटील, प्र.वा.कोळी, संजय नामदेव चौधरी, अजय शिवाजी पाटील, जयपाल भिमसिंग राजपूत, विकास ओंकारसिंग राजपूत, पृथ्वीराज आनंदा पाटील यांच्यासह अनेक सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.