जिल्ह्यात आजपासून विद्यार्थ्यांसाठी लसीकरण

जिल्हा प्रशासनाकडे 94 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मोहिम
जिल्ह्यात आजपासून विद्यार्थ्यांसाठी लसीकरण
लसीकरण

धुळे Dhule । प्रतिनिधी

जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी (Corona preventive vaccination) कालपासून ऑनलाईन नोंदणी (Online registration) सुरु झाली आहे. उद्या दि. 3 जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात होईल. दरम्यान जिल्ह्यात या वयोगटातील एक लाख 13 हजार 447 विद्यार्थी आहे. लसीकरणासाठी फक्त कोव्हॅक्सीनचाच वापर करण्यात येणार असून जिल्हा प्रशासनाकडे (district administration) कोव्हॅक्सिनचे 94 हजार डोस उपलब्ध झाले आहेत.

कोविड रूग्ण व ओमायक्रॉन व्हेरीएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने शासनाने 15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी कालपासून कोविन अ‍ॅप्सवर नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात मिशन युवा स्वास्थच्या धर्तीवर शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भात 2007 पुर्वी जन्मलेले इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या माहिती संकलीत करण्यात येत आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी शाळेतील टेक्नोसॅव्ही शिक्षकांची नोडल शिक्षक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांनी दिले आहेत.

डोस मुबलक उपलब्ध- 15 ते 18 वयोगटात जिल्ह्यात एक लाख 13 हजार 447 विद्यार्थी आहेत. त्यात महापालिका क्षेत्रात 21 हजार 867, धुुळे तालुक्यात 23 हजार 398, साक्री तालुक्यात 25 हजार 680, शिंदखेडा तालुक्यात 16 हजार 809 तर शिरपूर तालुक्यात 24 हजार 816 लाभार्थी आहेत. तर 60 वर्षावरील कोमार्बिड 54 हजार 442 आहेत. मुलांना तसेच कोमार्बीड यांना बुष्टर डोसासाठी कोव्हॅक्सिन वापरण्याचे आदेश आहेत. सध्या जिल्ह्यात जुना स्टॉकमध्ये 94 हजार कोव्हॅक्सिन शिल्लक आहेत.

युवासेनेतर्फे शिबिर- 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी महापालिका व शिवसेना-युवासेनेतर्फे शाळांमध्ये लसीकरण शिबीर घेण्यात येणार आहे.

जयहिंद सिनिअर महाविद्यालय (3 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत.) जो.रा.सिटी हायस्कूल (4 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत) जयहिंद ज्युनिअर महाविद्यालय. (5 जानेवारी रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत) जयहिंद ज्युनिअर महाविद्यालय (6 जानेवारी रोजी सकाळी ते दुपारी 3 वाजेपर्यंत) एसएसव्हीपीएस सायन्स महाविद्यालय, चावरा इंग्लिश मेडिअम स्कुल या शाळांमध्ये लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना सरसकट लसीकरण सुरू झालेले असून विद्यार्थ्यांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेण्यासाठी गर्दी होऊ नये पालक-विद्यार्थ्यांची तारंबळ उडू नये. विद्यार्थ्यांना सहज लस उपलब्ध व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

ज्या शाळेतील शिक्षकांना आपल्या शाळेत एकदिवसीय लसीकरण हवे असल्यास त्यांनी शिवसेना कार्यालय भगवा चौक येथे संपर्क साधावा असे आवाहन युवासेना महाराष्ट्र सहसचिव अ‍ॅड.पंकज गोरे यांनी केले आहे.

नोंदणीसाठी पुरावा आवश्यक

लसीकरणाच्या नोंदणीसाठी कोवीन अ‍ॅप्सवर आधारकार्ड किंवा अन्य ओळखीचा पुरावा देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी देखील आधारकार्ड आवश्यक राहणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांना शाळेचे ओळखपत्र देखील पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

आयुक्त, महापौरांचे आवाहन

15 ते 18 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी कोविन अ‍ॅप नोंदणी करावी. किंवा लसीकरण केंद्रावर देखील नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तरी लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून लस घ्यावी व आपल्या व परिवाराचे संरक्षण करावे, असे आवाहन महापौर व आयुक्तांनी केले आहे.

Related Stories

No stories found.