गुन्हेगारासह दोघे ताब्यात, घरफोडींची उकल
धुळे Dhule । प्रतिनिधी
शहरातील भोलाबाजार परिसरातील एकाच गल्लीत एकाच रात्री झालेले दोन घरफोडीचे (Burglary offences) गुन्हे व गल्ली नं. 4 मधील दुचाकी चोरीचा गुन्हा आझादनगर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. तीन चोरट्यांना ताब्यात (thieves arrested) घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा मालही हस्तगत करण्यात आला आहे.
गल्ली नं. 3 मधील भोलाबाजार परिसरातील रहिवासी अमीन उस्मान यांच्या घराचे बांधकाम सुरु असल्यमुळे त्यांनी जवळच भाड्याने घर घेतले होते. या घराला कुलूप लावून ते बांधकामाच्या ठिकाणी पहाणी करण्यासाठी गेलेले होते. त्यामुळे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दि.31 रोजी मध्यरात्री त्यांच्याकडे घरफोडी करीत 2 हजार 700 रुपये किंमतीचे पितळ, तांबे व अॅल्यूमिनीयमची भांडी, 21 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 23 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
तसेच याच गल्लीत राहणारे जावेद सलीम खाटीक हे देखील सुरत येथे कुटूंबासह लग्नाला गेलेले होते. त्यामुळे चोरट्यांनी त्यांचेही घर फोडले होते. त्यांच्या घरातून 8 हजार 50 रुपये किमतीचे पितळी भांडे, मोबाईल, भिशीचे पैसे लंपास केले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. आझादनगर पोलिसांनी तपास सुरू करीत गुप्त माहितीच्या आधारे सोयल मजीद मन्सूरी (वय 19 रा.शिवाजीनगर, धुळे) व एका 16 वर्षीय विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्यांच्याकडील 6 हजार 950 रुपयांचे तांबे, पितळ व अॅल्युमिनीयमचे भांडे, एक मोबाईल व 10 हजार रुपये किंमतीचे दोन ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 16 हजार 950 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, शोध पथकातील पोहेकॉ योगेश शिरसाट, बापू कोकणी, अविनाश लोखंडे, पोकॉ शाहेब बेग, आतिक शेख, एस.एन. मोरे, एस.पी.शेंडे, पोना संदीप कढरे, योगेश शिंदे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोहेकॉ बापू कोकणी करीत आहेत.
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलगा
आझादनगर पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी चोरीचा छडा देखील पोलिसांनी लावला असून त्यात अल्पवयीन चोरटा पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याने चोरीची कबूली दिली आहे. शहरातील ग. नं. 4 मधील एका मस्जिदीजवळून दि.29 जानेवारी रोजी रात्री जुम्मन गफार शाह (रा. गल्ली नं. 1 वडजाई रोड) यांची दुचाकी चोरीस गेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात हा गुन्हा एका सराईत विधी संषर्घ बालकाने केल्याचा पोलिसांना संशय होता. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. तो चोरी केलेल्या दुचाकीची विल्हवाट लावीत असल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेतले. पालकांसमोर त्यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली.
त्यांच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. त्याने बेवारस सोडून दिलेली 20 हजार रूपये किंमतीची विना क्रमांकाची दुचाकी देखील हस्तगत करण्यात आली. एकुण 56 हजार 950 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे.