देशातून दहशतवाद संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

संरक्षण मंत्री राजनाथसिंह : दोंडाईच्यात शिव-राणांच्या स्मारकांसह राजपथाचे लोकार्पण
देशातून दहशतवाद संपविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

दोंडाईचा । Dondaicha । प्रतिनिधी

देशात नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) आल्यापासून देशाची विकासाकडे (development) घोडदौड सुरू असून आपला देश दिवसेंदिवस प्रगतीकडे वाटचाल करीत आहे, आज आपली 3 ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था झाली असून पुढील 3 ते 4 वर्षात 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था झाल्यावर जगात टॉप 3 देशामध्ये आपले नाव होईल, असे सांगतांनाच येत्या काळात देशातून दहशतवाद (Terrorism) संपविल्याशिवाय (finishing) आम्ही स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी केले.

देशाचे पहिले सी.डी.एस. बिपीन रावत यांच्या नावाने रस्त्याचे नामकरण करणारी दोंडाईचा ही पहिली नगरपालिका ठरली, असे गौरवोध्दार देखील त्यांनी काढले. ना.राजनाथसिंह यांच्या हस्ते आज दोंडाईचा शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, महाराणा प्रतापसिंह स्मारक, शहीद अब्दुल हमीद स्मारक, श्रीमंत राजे दौलतसिंहजी रावल स्मारक, सी.डी.एस.जनरल बिपीन रावत मार्ग नामकरण, तसेच दोंडाईचा शहराचा मुख्य रस्ता असलेल्या राजपथाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकासरत्न सरकारसाहेब रावल होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खा. डॉ.सुभाष भामरे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल, मुख्याधिकारी प्रविण निकम, धुळयाचे महापौर प्रदिप कर्पे, जि.प.चे अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुम निकम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, शहराध्यक्ष प्रविण महाजन, बांधकाम सभापती निखील जाधव आदी उपस्थित होते.

मंत्री राजनाथसिंह म्हणाले की, महाराष्ट्र ही संताची आणि विरांची भूमी आहे, त्यामुळे मी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतो तेव्हा मला गर्व वाटतो, आज ज्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्या प्रत्येक महापुरूषांच्या मागे मोठा इतिहास आहे त्यांच्यापासुन प्रेरणा घेवून आता दोंडाईचाची जनता त्यांचा आदर्श ठेवेल, असे नमुद करत ते म्हणाले की, आम्ही जाहिरनाम्यात जे लिहीतो ते प्रत्येक वचन पूर्ण केलेले आहे, जेव्हा कलम 370 काढण्याचे आम्ही जाहिरनाम्यात दिले होते तेव्हा काही लोक आम्हाला हसत होते, पण आम्ही कलम 370 तर काढून काश्मिरला देखील आपल्या राज्याप्रमाणे करून दाखविले. मोदी सरकार आल्यापासुन आम्ही सर्वच राज्यांचा समान विकास करत आहोत, आज देशातील कोटयावधी शेतकर्‍यांना 6 हजार रूपये अनुदान खात्यात येते, आयुष्यमान योजनेतून 5 लाख रूपयांचा उपचार हा मोफत केला जातो, देशातील गरीबांना मोफत धान्य मिळत असून सबका साथ सबका विकास हाच ध्यास घेवून आमचे सरकार काम करीत आहे. आमचा भारत देश आता केवळ देशात आलेल्या आतंकवादयांनाच नव्हे तर बाहेरच्या देशात घुसून देखील मारतो, अशी प्रतिमा निर्माण केली आहे. याचे उदाहरण सर्जिकल स्ट्राईक, एयर स्ट्राईक करुन जगाला दाखवून दिले. पुढील काळात देशातील दहशतवाद संपविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही ते म्हणाले.

विकास पाहून आश्चर्य

माझ्या जीवनात अनेक नगरपरीषदा पाहिल्या पंरतू एवढा प्रचंड विकास करणारी दोंडाईचा ही एकमेव नगरपालिका पाहिली असून एवढया लहान शहरात चकाचक रस्ते, पालिकेची अत्याधुनिक इमारत, दिल्लीत राजपथप्रमाणे राजपथ आणि संविधान पथ याशिवाय महापुरूषांची स्मारके, ही संकल्पना मांडणारे जयकुमार रावल यांचे विशेष अभिनंदन करावे तेवढे कमी आहे.

नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल आणि माजी मंत्री आ.जयकुमार रावल यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी माजी मंत्री आ.जयकुमार रावल, खा.डॉ.सुभाष भामरे यांनी देखील मनोगत मांडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com