
धुळे - प्रतिनिधी Dhule
आदिवासी बांधवांनी नेहमीच निसर्गाशी एकरूप होत त्याचे संवर्धन केले आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या खाद्य संस्कृतीतही दिसून येते. रानभाज्या महोत्सवातून राज्याला आदिवासी खाद्य संस्कृतीची नव्याने ओळख होईल, असे प्रतिपादन आमदार मंजुळा ताई गावित यांनी केले.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्यातर्फे साक्री येथे तालुका कृषी अधिकारी
कार्यालय व कृषी चिकित्सालयात आज सकाळी रानभाज्या महोत्सव व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन आमदार श्रीमती गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, जिल्हा परिषदेच्या सदस्या विमलबाई पवार, साक्री पंचायत समितीचे उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे,
तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, उपस्थित होते. आमदार मंजुळाताई गावित म्हणाल्या, की आदिवासी बांधवांनी रानभाज्यांचे महत्व यापूर्वीच ओळखले आहे. त्यामुळे त्यांच्या आहारात नेहमीच यांचा समावेश असतो.
या रानभाज्यांचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. त्याबरोबरच या भाज्यांमधील गुणधर्म त्यांचे वैशिष्ट्य यांचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे. या रानभाज्या मुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोग प्रतिकारक्षमता वाढणे आपणास उपयुक्त ठरणार आहे. कृषी आणि वन विभागाने रानभाज्यांचे महत्व ओळखत त्यांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांचे दस्तावेजीकरण करत या भाज्यांचे संवर्धन व संगोपन केले पाहिजे.
राज्य शासनाचा रानभाज्या महोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद असून तो अनुकरणीय आहे. अन्य ठिकाणीही अशाच प्रकारचे उपक्रम राबविण्यात यावेत, असेही आमदार श्रीमती गावित यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.सोनवणे म्हणाले, की राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात साक्री तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला असून एकूण 46 प्रकारच्या रानभाज्या या महोत्सवात मांडण्यात आल्या होत्या. रानभाज्यांचे संवर्धन व संगोपनासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न केले जातील. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, धुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचे सहकार्य घेण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी सांगितले.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. नांद्रे यांनी आदिवासी भागात सापडणार्या रानभाज्यांचे महत्व या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, विशाल देसले यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.