लॅपटॉप भंगार व्यवसायिकाकडे विकण्यापूर्वीच चोरटा जेरबंद

धुळे शहर पोलिसांची कामगिरी
लॅपटॉप भंगार व्यवसायिकाकडे विकण्यापूर्वीच चोरटा जेरबंद

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरातील ताराकिंत हॉटेल (Hotel) गोल्डन लिफच्या पार्किंगमध्ये उभ्या कारमधून लॅपटॉप लांबविणाऱ्या चोरट्याला शहर पोलिसांच्या (police) शोध पथकाने जेरबंद केले आहे. तो भंगार व्यवसायिकाकडे हा लॅपटॉप विक्रीच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून 50 हजारांचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांच्या वेगवान तपासाचे कौतुक होत आहे.

खाजगी नोकरदार राम सयाजीराव बोरसे (वय ४१ रा.प्लॉट नं डी ८०३ व्यकंटेश लेक व्हिस्टा, पुणे) हे त्याचे कारने (क्र एमएच १२-टीएस -५६५९) दि.8 एप्रिल रोजी नातेवाईकांच्या लग्न समारंभानिमित्त धुळ्यातील हॉटेल गोल्ड लिफ येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी सकाळी ११ वाजता त्यांना कंपनीकडुन मिळालेला अँपल मॅकबुक प्रो १६ कंपनीचा लॅपटॉप हा कारमध्ये ठेवुन लॉक करुन कार हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावून लग्न समारंभाला गेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांनी कार जवळ येवून पाहिले असता गाडीचा दरवाजा उघडा दिसला. त्यात ठेवलेला लॅपटॉपही दिसुन आला नाही. आजुबाजुस तसेच पार्किंगमध्ये असलेल्या सिक्युरीटी गार्डला विचारपुस केली असता त्याने काही माहित नसल्याबाबत सांगितले. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना दि १४ रोजी चाळीसगांव रोड पुर्व हुडकोतील हिदायत मशिद जवळ राहणार कलीम शाह हा भंगार व्यवसायिकांकडे अँपल कंपनीचा लॅपटॉप विक्री करण्यासाठी घेवून फिरत आहे, अशी खात्रीशिर माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना गोपनिय बातमीदारमार्फत मिळाली. त्यांनी शोध पथकाला संशयितांचा शोध घेण्याचे आदेशीत केले. त्यानुसार पथकाने संशयित फकीर कलीम शाह मस्तान शाह (वय.३८.रा.पुर्व हुडको, हिदायत मशिद जवळ धुळे) यांला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून ५० हजारांचा अँपल मॅकबुक प्रो १६ कंपनीचा लॅपटॉप हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.पो अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेनुसार शोध पथकाचे पोलीस अंमलदार पोहवा मच्छिद्र पाटील, विजय शिरसाठ, पोना कुंदन पटाईत, पोकॉ मनिष सोनगिरे, महेश मोरे, प्रविण पाटील, निलेश पोतदार, शाकीर शेख, तुषार मोरे, अविनाश कराड, प्रसाद वाघ, गुणवंतराव पाटील यांच्या पथकाने केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com