मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

साक्री तालुक्यातील आबांपाडा गावातील घटनेने खळबळ
मुलानेच केला जन्मदात्या आईचा खून

धुळे । प्रतिनिधी Dhule

साक्री (Sakri) तालुक्यातील कुडाशी पैकी आंबा पाडा येथे काल माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यावरून मुलानेच जन्मदात्या आईला मारहाण करत तिचा खून केला, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी मुलास अटक केली आहे. याबाबत चुनीलाल बागुल यांनी पिंपळनेर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुलाब बंडु बागुल (रा.कुडाशी पैकी अंबापाडा ता.साक्री) याला दारू पिण्याचे व्यसन आहे. काल रात्री आठ वाजेपुर्वी त्याने आई सुमनबाई बंडू बागुल (वय 60) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र सुमनबाई यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग येवून गुलाब याने आईस हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तिचे डोके घरातील भिंतीवर व फरशीवर आपटून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत करून तिचा खून केला.

त्याबाबत गावातील चुनीलाल तानाजी बागुल (वय 55) हे त्याला समजविण्यास गेले असता त्याने त्यांना देखील हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मैराठे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गुलाब बागुल यास ताब्यात घेतले. त्यांच्यावर पिंपळनेर पोलिसात भादंवि कलम 302, 323, 504. 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि साळुुंखे करीत आहेत.

Related Stories

No stories found.