स्थायीच्या सभेत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे

मोकाट कुत्रे, हद्दवाढ गावातील भुखंड, मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या, पथदिव्याचा मुद्दा गाजला
स्थायीच्या सभेत महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे

धुळे Dhule। प्रतिनिधी

महापालिकेच्या (Municipal Corporation) स्थायी समितीच्या सभेत (Standing Committee meeting) सदस्यांनी पुन्हा मनपाच्या कारभाराचे वाभाडे (Charges of administration) काढले. मोकाट कुत्रे, हद्दवाढ गावातील भुखंड, मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या, पथदिव्याचा मुद्दा मांडत सदस्यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, संजय जाधव, हर्षकुमार रेलन, नगरसेविका किरण कुलवार आदी उपस्थित होते.

संजय जाधव यांनी आयुक्त आल्याने त्यांचे अभिनंदन करा असे म्हणत त्यांनी चिमटा काढला. जाधव यांनी हद्दवाढ गावातील भुखंडांचा मुद्दा मांडला. मागच्या आठवड्यात हद्दवाढ गावाबाबत आदेश निघालेत. त्याची प्रत मिळावी. भुखंडाबाबत समिती घटनास्थळी जात असेल तर त्यांचे अभिनंदन मात्र केवळ काम केले असे वाटू नये लॅण्ड ऑडीटचे आदेश व्हावेत याप्रकरणाच्या मुळाशी गेलो तर शेकडो कोटींचे भुखंड मिळतील. महापालिका मालामाल होईल. असे त्यांनी सांगितले.

आस्था ठेकेदाराबाबतचा त्यांनी उपस्थित करुन बदली झालेले अधिकारी शांताराम गोसावी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. आस्थाबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली जाणार होती. त्याचे काय झाले? असा मुद्दा जाधव यांनी उपस्थित केला.

किरण कुलेवार यांनी कामाच्या अंमलबजावणीबाबत पत्र दिले. प्रभागात खूप समस्या आहेत. 15 दिवसांपासून दिवे बंद असून वीज विभागाचे बागुल फोन उचलत नाहीत. आम्ही त्यांच्याकडे कामाला आहोत का? असा सवाल केला. कुत्र्यांचा प्रश्न बिकट असून डॉग व्हॅनचे काय झाले? डॉग व्हॅन मिस्टर इंडियाप्रमाणे अदृष्य आहे का? गटार, वीज अशा मुलभूत प्रश्नांसाठी मोर्चा आणायचा का? प्रभागात कुत्र्यांनी धुमाकुळ घातला असून प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे महापालिकेत कुत्रे आणू. त्यांच्या गळ्यात अधिकार्‍यांच्या नावाच्या पाट्या लावून फिरवेल असा इशाराही कुलेवार यांनी दिला. त्यावर सभापती नवले यांनी येत्या आठवड्याभरात डॉग व्हॅनबाबत वर्क ऑर्डर काढा असे आदेश दिले.

सभापती नवले यांनी बांधकाम विभागाच्या कारभारावरही ताशेरे ओढले. ज्यांच्याकडे साधे सेंट्रींग मटेरियल नाही, त्यांना कोटी - कोटीचे ठेके कसे दिले जातात. निविदा मंजुर करताना शासनाच्या सर्व मार्गदर्शक सुचना असताना त्याकडे दुर्लक्ष का केले जाते. अनुभव नसतांना कामे दिली जातात.त्यामुळे गुणवत्ता राखली जात नाही. म्हणून निविदा समितीमध्ये यासर्व बाबींचा विचार करावा, मार्गदर्शक सुचनांचे पालक करावे. अशा सुचना नवले यांनी दिल्या.

हर्ष रेलन यांनी प्रशासनाच्या कामचुकारपणावर ताशेरे ओढले. प्रशासन काम करण्याच्या मानसिकतेत नाही. वीज विभागाचे बागुल अमरनाथला गेले. हे जरी खरे असले तरी तेे सर्व विभाग सोबत घेवून गेले होते का? महापालिकेच्या शाळा क्र.14 चा मुद्दा 21 दिवसाआधी मांडला. परिस्थिती जैसे थे आहे.

किंबहुना आणखी बिघडली. आधी सहा विद्यार्थी होते आज विद्यार्थी संख्या शुन्य झाली आहे. मराठी मुलांचे भवितव्य भयावह दिसते. प्रशासनाला मराठी भाषा संपवायची आहे का? शाळांच्या दुरुस्तीबाबत बजेट व तरतुदी असतात मात्र कार्यवाही होत नाही. असा संताप त्यांनी व्यक्त केला. यावर सभापती नवले यांनी या विषयावर महासभेत चर्चा झाली पाहिजे. विशेष बैठक घेवू असे सांगितले.

प्रशासनाने आता दखल घ्यावी

सभेत सदस्यांनी मोकाट कुत्रे, हद्दवाढ गावातील भुखंड, मनपा शाळेतील विद्यार्थी संख्या, पथदिव्याचा मुद्दा मांडला आहे. प्रत्येक सभेत सदस्य विषय मांडतात. परंतू प्रशासन गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे सदस्यांचे निराकरण होत नाही. अधिकारी सभेला येतात. परंतू त्यानंतर काहीच होत नाही. ही बाब गंभीर असून आता हे खपवून घेतले जाणार नाही. सदस्यांचे प्रश्न सुटलेच पाहिजे. सदस्यांना त्यांच्या प्रभागात नागरीकांना उत्तरे द्यावे लागतात. त्यामुळे सदस्यांचे प्रश्न सोडवावेत असे निर्देश सभापतींनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com