
धुळे ।dhule। प्रतिनिधी
शहरातील चितोड रोड परिसरात घरमालकाचा (householder) खून (murder) करणार्या भाडेकरुच्या मुलास (tenant's son) जन्मठेपेची शिक्षा (Life sentence) ठोठावण्यात आली आहे. हा महत्वपुर्ण निकाल न्यायमूर्ती एस.सी. पठारे यांनी दिला. या खटल्यात मयताच्या पत्नीची साक्ष महत्वपूर्ण ठरली.
चितोड रोडवरील राजहंस कॉलनीत रमेश हिलाल श्रीराव (वय 62) हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कॅशिअर वास्तव्यास होते. त्यांचाच भाडेकरु असलेल्या शिवनाथ मेमाणे यांचा मोठा मुलगा अजिंक्य मेमाणे (वय 23) याने टेरेसवर लोखंडी पाईप आणि कशाच्या तरी सहाय्याने डोक्यावर वार करून रमेश श्रीराव यांचा खून केला होता. तसेच त्यांच्या पत्नी प्रमिला श्रीराव यांना गळ्यावर काटा चमच्याने मारून त्यांनाही जीवे ठार करण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना दि.22 जून 2021 रोजी घडली होती.
याप्रकरणी प्रमिला रमेश श्रीराव यांच्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्या दाखल करण्यात आला होतो. गुन्ह्याचा तपास एपीआय दादासाहेब पाटील यांनी केला. त्यांना पो.कॉ.तुषार मोरे यांची रायटर म्हणून मदत झाली.आरोपीविरुध्द धुळे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याखून प्रकरणात एकूण 13 साक्षीदार फिर्यादी पक्षातर्फे न्यायालयात तपासण्यात आले.
या प्रकरणात सरतपासणीच्यावेळी फावडे, दांड्यासहित, चप्पलचा जोड, काटेरी चमचा, लोखंडी पाईप साक्षीच्या वेळी दाखविण्यात आले होते. ते सर्व पुरावे साक्षीदाराने ओळखले. या खटल्यात मयत रमेश श्रीराव यांच्या पत्नी तथा फिर्यादी प्रमिला रमेश श्रीराव यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्यायालयाने साक्ष, पुरावे ग्राह्य धरून आरोपी अजिंक्य यास खुनासाठी जन्मठेप व कलम 324 नुसार दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्रसिंग तंवर व मुळ फिर्यादी प्रमिला श्रीराव यांचे वकील अॅड. मोहन भंडारी, अॅड.चैतन्य भंडारी यांनी कामकाज पाहिले. त्यांना अॅड. मयूर बैसाणे, अॅड. प्राजक्ता राणा, अॅड. भाग्यश्री भंडारी यांचेही सहकार्य लाभले.