ग्रामसेवकासह पोलीस पाटलावर निलंबनाची कारवाई

ग्रा.पं.बरखास्तीची शिफारस, गावात पोलीसांचा मोठा फौजफाटा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस विभागाने केले आवाहन
ग्रामसेवकासह पोलीस पाटलावर निलंबनाची कारवाई
USER

धुळे । प्रतिनिधी dhule

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील वाघाडी बुद्रुक गावात परवानगी न घेता रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 14 फुटी अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला.

या प्रकरणी काल सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान गावाचे पोलिस पाटील, ग्रामसवेकाला निलंबित करण्यात आले आहे. तर ग्रामपंचायत बरखास्तीची शिफारसही करण्यात आली असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अफवांवर विश्‍वास न ठेवता शांतता राखावी, कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दि.5 रोजी मध्यरात्री वाघाडी बु.गावात ग्रामपंचायतीसमोर विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा 14 फुटी अश्‍वारुढ पुतळा बसविण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. परंतु पोलिस प्रशासनाने संयमाने प्रकरण हाताळत शांतता निर्माण केली. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुमारे अडिचशे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. गावातील एका मंडळाला ग्रामपंचायतीने सुशोभिकरणाची परवानगी दिली होती. परंतु या मंडळाने तेथे चबुतर्‍याचे बांधकाम केले. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंच, दिलीप पाटील यांनी 2 जानेवारी रोजी या मंडळाला सुशोभिकरणाची परवानगी दिलेली असताना बांधकाम का केले जात नाही, याबाबत विचारणा करणारे पत्र पाठविले. पोलिस प्रशासनाची देखील याप्रकरणावर नजर होती.

त्यानंतर दि.5 रोजी मध्यरात्रीनंतर पुतळा बसविण्यात आला. परवानगी न घेता पुतळा बसवल्याप्रकरणी प्रशासनाने कार्यवाहीला सुरुवात केली. परंतु ग्रामस्थांच्या भावना तिव्र होत्या.त्यांची समजूत काढत आमचा पुतळा बसविण्याला विरोध नसुन परवानगी घेवून नंतरच पुतळा बसवा, असे सांगितल्यानंतर ग्रामस्थ शांत झाले. पोलिस प्रशासनाच्या भुमिकेला स्थानीक प्रतिनिधी देखील सहकार्य केले. महापुरुषांचे पुतळे बसविण्यापूर्वी अधिकृत परवानगी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com