वसतिगृहातच विद्यार्थिनीची आत्महत्या

गृहपालसह वरिष्ठ अधिकार्‍यांना गांभीर्य नाहीच; नागरिक संतप्त
वसतिगृहातच विद्यार्थिनीची आत्महत्या
वैशाली तापीदास गावित

दोंडाईचा । Dondaicha

येथील बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्यावरील शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली. घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गृहपालसह वरिष्ठ अधिकार्‍यारी रात्री उशिरापर्यंत देखील घटनास्थळी दाखल झालेले नव्हते. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.

वैशाली तापीदास गावित (वय 19 रा. पिंपळे पोस्ट खडकी ता. नवापूर) असे तिचे नाव आहे. ती शहरातील अहिंसा पॉलिटेक्निकल कॉलेज (Ahinsa Polytechnic College) येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या (Civil Engineering) प्रथम वर्षाची परिक्षा देत होती.

वैशाली गावित ही नवापूर तालुक्यातील पिंपळे येथील रहिवासी होती. वसतिगृहातील रुममध्ये तिने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सांयकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान एका मुलीच्या निदर्शनास आली. याबाबत कनिष्ठ लिपिक कैलास धनगर यांना कळताच वसतिगृहाच्या गृहपाल रिना जाधव यांना कळविले. मात्र जाधव या धुळे येथे टपाल देण्यासाठी गेल्याने रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पोहचलेल्या नव्हत्या. त्यामुळे नागरिक एकच संताप व्यक्त करत होते.

घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, उपनिरीक्षक दिनेश मोरे, पोलीस कर्मचारी संदीप कदम, धिरज काटकर, नरेंद्र शिरसाट आदी घटनास्थळी दाखल झाले होते. विद्यार्थीनीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी अर्जुन नरोटे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. या घटनेमुळे वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी प्रचंड घाबरलेल्या दिसत होत्या.

दरम्यान याच वसतीगृहात सुमारे तीन वर्षापुर्वी शासकीय वसतिगृहातील कर्मचार्‍यांच्या हलगर्जी पणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता.

पेपरही गेला होता चांगला

गेला- मयत वैशाली ही आज गणित विषयाचा पेपर सकाळी 9 ते 1 दरम्यान देऊन आली होती. तिला पेपरही चांगला गेला होता. कॉलेजमध्ये आल्यावर तिच्या चेहर्‍यावर काही तणावही नव्हता. दुपारचे जेवण करून ती हॉलमध्ये झोपली होती. त्यानंतर वैशाली केव्हा उठून रूममध्ये गेली ते झोपेत समजले नाही. आम्हाला जेव्हा जाग आली तेव्हा आमच्या जवळ नव्हती. तेव्हा तिच्या रूमचा दरवाजा बंद होता. त्यानंतर कनिष्ठ लिपिक यांना बोलावले, अशी माहिती वैशाली सोबत राहणार्‍या तिच्या मैत्रिणीने दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com