ब्लॉग : साहेब...आपला सच्चा मावळा गुदमरतोय!

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर माथा टेकतांना आ.मंजुळा गावीत
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर माथा टेकतांना आ.मंजुळा गावीत

मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आला आहे. शिवसेनेतून एक-दोन नव्हे तर तब्बल 25 पेक्षा अधिक आमदार बाहेर पडून आपल्या सोबत 40 आमदारांचा दावा करीत शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे हे आसाममधील गुवाहाटीत जावून बसले आहेत. त्यांच्या या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडून शिवसेना कोणाची बाळासाहेबांची की, शिंदेंची? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. वाटाघाटीतून मार्ग निघेल, सरकार पडेल अथवा टिकेल, येत्या दोन-चार दिवसात चित्र स्पष्ट होईल. पण यामुळे शिवसैनिकांमध्येही दोन गट पडले असून याचे गाव पातळीवर पडसाद उमटत आहेत.

धुळ्यातही शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावीत आणि महानगर प्रमुख सतिष महाले यांनी बंडखोरांच्या शिंदे गटाचे समर्थन केले आहे. डॉ.गावीत एकनाथ शिंदेच्या पाया पडून त्यांच्यात सहभागी झालेत. तर श्री.महाले यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ शहरात बॅनर्स झळकावलेत. यामुळे स्थानिक पातळीवर पुन्हा एकदा निष्ठावंत शिवसैनिकांविरुध्द गद्दार अशी परिस्थिती निर्माण झाली. सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ धुळ्यात भक्ती यात्रा काढली. ‘साहेब, आम्ही आपल्या सोबत आहोत’ असा नारा दिला. या भक्ती यात्रेलाही सेनेचेच काही पदाधिकारी गैरहजर होते. आता ही परिस्थिती शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करणारी नाही तर पक्षावर आलेले हे संकट आहे. असे असतांना शहरातील दुसरे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, दुसरे महानगरप्रमुख मनोज मोरे यांच्यासह काही पदाधिकारी भक्तीयात्रेत गैरहजर जाणवले. परिस्थिती कुणाला श्रेय मिळावे किंवा नेत्यांच्या नजरेत कुणी चमकावे ही नाही, तर धुळ्यातील शिवसेना गद्दारीला थारा देत नाही, आम्ही एकसंघ आहोत हे दाखविणारी होती. पण असो, ही चूक निदर्शनास येताच सारवा सारव झाली आणि आमच्यात फूट नाही अशा प्रतिक्रिया बाहेर आल्यात.

तात्या.. तुम्ही चुकलेच!

विद्यमान महानगरप्रमुख सतीष तात्या महाले यांनी शिवसेनेत काही वर्ष काम केले आहे. बाळासाहेबांचे विचार, शिवसेनेची धोरणे आणि आदेशावर चालणार्‍या पक्षाची शिस्त त्यांना माहिती आहे. सेनेत त्यांनी काही पदेही भोगली आहेत, असे असतांना संकटकाळी बाहेर पडून बंदखोरांमध्ये जावून मिसळणे ही त्यांची चुकच म्हटली पाहिजे. पण सतीष महाले असे का वागलेत? याला सेनेतील अंतर्गत मतभेदाची काही कारणे आहेत. प्रत्येकाचे पोटापाण्याचे व्यवसाय वेगवेगळे आहेत. सार्वजनिक जीवनात वावरतांना कुणीच कुणाच्या व्यक्तीगत जीवनात डोकवू नये असा एक अलिखीत नियम असतो. शिवसैनिकांनी तो पाळला. म्हणूनच ते कधीच सतीष महालेंच्या खासगी आयुष्यात डोकावले नाहीत. परंतु भूखंडाच्या एका प्रकरणात श्री.महाले अडकले, गुन्हा दाखल झाला, जेल वारीही झाली. यावेळी मात्र त्यांना पक्षातील पदाचा राजीनामा द्यावा लागला. कुणी यास हकालपट्टीचेही नाव दिले. काही असो, पण त्यावेळीही सेनेत अंतर्गत धगधग होतील. वरुन दिसत नसली तरी वेगवेगळे गट कार्यरत होते. एव्हढेच काय, पदाधिकार्‍यांचे कार्यालये, बसण्या उठण्याच्या जागाही वेगळ्या होत्या. हे चित्र आज बदलले आहे असे नाही. पण किमान आंदोलनात किंवा पक्षकार्यात सगळे एकत्र असल्याचे दाखवितात.

अंतर्गत मतभेद सर्वच पक्षात आहेत. शिवसेना यास अपवाद नाही. पक्षाबाहेर गेलेले सतीष महाले पुन्हा सेनेत कसे आले, हे सार्‍यांना ठाऊक आहे. आले तर आले थेट महानगरप्रमुख पद घेवून विराजमान झाले, ही बाब काहींना खटकली असावी. परंतु पक्षातील नेत्यांशी श्री.महाले यांचे असलेले संबंध संपर्क प्रमुखांसह बड्या नेत्यांशी असलेली घनिष्ठता पाहता ‘त्यांना सामावून घ्या, निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घ्या’ असे ‘आदेश’ वरिष्ठांकडून मिळत गेले. म्हणूनच झाकली मूठ... वरवर सारे अलवेल होते. असे असूनही आमदारकीचे स्वप्न पहाणार्‍या सतीष महालेंनी सेनेच्याच बंडखोरांना जावून मिळावे यामागे काही व्यावसायीक गुपीते तर नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली जाते आहे.

पहिल्यांदा श्री.महाले पक्षातून बाहेर गेल्यानंतरही वरिष्ठांच्या आदेशानुसार महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही पदाधिकारी त्यांना घरी जावून भेटलेत. पण महाले मनपा निवडणुकीत सेनेकडून सक्रीय झाले नाहीत. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार हिलाल माळीसह बाकी पुन्हा त्यांना घरी जावून भेटलेत. यावेळीही महालेंनी काम तर केले नाही उलट अपक्ष उमेदवार राजवर्धन कदमबांडे यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली. मग श्री. महाले यांना पक्षाचे काम करायचेच नसेल तर त्यांना महत्वाचे पद देवून पुन्हा-पुन्हा सक्रिय करण्यासाठी नेत्यांचा आग्रह का? हा प्रश्न निष्ठावंत, सच्चा आणि सेनेसाठी काहीही करणार्‍या मावळ्यांना सतावणे स्वाभाविकच आहे.

मावळ्यांचे काय?

शिवसेनेत वरुन येणार्‍या आदेशाला कमालिचे महत्व आहे. आदेश डोक्यावर घेवून वाट्टेल ते करण्यासाठी बाळासाहेबांचा शिवसैनिक सदैव तयार असतो. पण असे आदेश निघण्यापुर्वी खालून जाणारी माहिती देखील तेव्हढीच महत्वाची असायला हवी. बर्‍याचदा चुकीच्या माहितीच्या आधारावर चुकीच्या गोष्टी घडतात. अलिकडे सेनेत असेच घडते आहे. यामुळेच यापुर्वी साधा शिवसैनिक म्हणूनही काम न केलेल्या, सेनेचा अनुभव नसलेल्या आणि दुसर्‍या पक्षातून आलेल्या डॉ.तुळशिराम गावीत यांना सेनेत थेट जिल्हाप्रमुख पद मिळाले. वास्तविक या पदापर्यंत जाण्यासाठी जिल्ह्यातील असंख्य शिवसैनिकांनी जीवाचे रान केले आहे. मुख्यमंत्र्यांची गाडी धुळ्यात अडवून राज्याचे लक्ष वेधून घेत स्वतःवर गुन्हे दाखल करुन घेतले. माय मावल्यांना छळणार्‍या तहसीलदारला अर्धनग्न फिरवून स्वतः जेलमध्ये गेले, सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलने केलीत. यापैकी अजूनही काहींच्या वार्‍या कोर्टात सूरू आहेत. परंतु अशा निष्ठावंतांना लवकर पदे मिळाली नाहीत. ज्यांना मिळाली ती दिर्घकाळ टिकली नाहीत. तरीही निष्ठेने काम करणार्‍यांना बाजूला ठेवण्यात आले. तर इतर पक्षातून आलेल्या ‘आयारामां’साठी पक्षात सतरंज्या अंथरण्यात आल्याची खंत सच्चा मावळ्यांना आहे. म्हणूनच की काय, पुन्हा पक्षात आलेले सतीष महाले असो की, आमदार पत्नीचे बोट धरुन शिवसेनेत आलेले डॉ.तुळशिराम गावीत असो, यांच्या नियुक्तीवर खासगीत अनेकांची तक्रार आहे. तरीही त्यांच्या ओठांवर ‘जय भवानी, जय शिवाजी’चा नारा आहे. राष्ट्रवादी आणि भाजपातून चटके सहन करीत मनोज मोरे सेनेत आले. त्यांनाही पद मिळाले. त्यांनाही आधी शिवसैनिक म्हणून काम करु द्यायला हवे होते, असे काहींना वाटते. परंतु पद मिळाल्यानंतर मनोज मोरे यांनी हाताळलेले विषय, सुरु ठेवलेला आंदोलनांचा धडाका, पक्ष संघठन आणि कार्य वाढण्यासाठी पुरक ठरणारा आहे.

राज्यात उठलेले बंडखोरीच वादळ आज ना उद्या शांत होईल. यातून जे व्हायचे ते होईल परंतु शिवसेनेचा आत्मा असणार्‍या आणि गावपाड्यावर सळसळणार्‍या रक्तवाहिन्या असलेल्या सच्चा मावळ्यांना जपावेच लागेल, त्यांच्याही भावना समजून घ्याव्या लागतील. साहेब.. आपला मावळा गुदमरतोय, त्याच्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज असल्याची आर्त हाक शिवसैनिकांची आहे.

Anil Chavan
Anil Chavan
मंत्री एकनाथ शिंदेंच्या पाया पडून बंडखोर गटात सहभागी झालेले आ. मंजुळा गावित व डॉ.तुळशीराम गावित
मंत्री एकनाथ शिंदेंच्या पाया पडून बंडखोर गटात सहभागी झालेले आ. मंजुळा गावित व डॉ.तुळशीराम गावित

तेव्हा टेकला माथा, आता पडलेत पाया

साक्री विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आ.मंजुळा गावीत यांनी नंतर शिवसेनेला उघड पाठिंबा दिला. नव्हे तर सदस्यत्वही स्विकारले. अर्थातच त्यांचे पती डॉ.तुळशिराम गावीत हेही सेनेत दाखल झाले. अर्थात हे दाम्पत्य यापुर्वी भाजपात होते. भाजपाने त्यांना चांगल्या पदावरही संधी दिली होती. परंतु सत्तेची गणिते नेहमीच निराळी असतात. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. सेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आणि आ.मंजुळा गावीत यांनी शिवसेनेची वाट धरली. आतापर्यंत सुरळीत सुरु असल्याचे वरवर दिसत होते. आतुन मात्र राज्य पातळीवर सुरु असलेली खदखद आदिवासी पट्ट्यातील साक्रीपर्यंतही पोहचली आणि सेनेतील अत्यंत निष्ठावंत, विद्यमान मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारताच या गावीत दाम्पत्याने सेनेला सोडून शिंदेख्या पायापडत त्यांच्या गटात जावून बसणे उचीत समजले.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावर अत्यंत श्रध्देने नतमस्तक होणार्‍या, माथा टेकणार्‍या आ.गावीत सार्‍यांनी बघितल्या आहेत. सहाच महिन्यात ही निष्ठा गेली कुठे? अर्थात कुणी कुठे जावे हे स्वातंत्र्य आहे. पण मग निष्ठेला मोल नाही काय? उद्या बंड शमले, सरकार तरले तर या बंडखोर आमदारांचे काय? सत्तेसाठी कदाचित माफी मिळेलही पण ज्यांनी मतदान करुन पठविले ते मतदार माफ करतील काय?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com